yuva MAharashtra 'सलमान खानच्या प्रकरणात त्वरित कारवाई; मग...'; अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची पोस्ट

'सलमान खानच्या प्रकरणात त्वरित कारवाई; मग...'; अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची पोस्ट



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.१६ एप्रिल २०२४
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरासमोर 14 एप्रिल रोजी पहाटे दोन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला आहे. याप्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. यातच आता सलमान खानच्या प्रकरणात तत्परता दाखवणारी मुंबई पोलीस अभिषेक घोसाळकर प्रकरणाचा तपास का करत नाही, असा सवाल करत तेजस्वी घोसाळकर यांनी केला आहे. सध्या त्यांची इनस्टाग्राम पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

तेजस्वी घोसाळकर यांची पोस्ट

“सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीजकडून त्वरीत कारवाई करण्यात आली. या हाय-प्रोफाइल घटनेवर तात्काळ लक्ष केंद्रित केले जाते. मात्र निष्काळजीपणाचे, त्रासदायक प्रकरण म्हणजे माझे पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा न झालेला उलगडा… अभिषेकच्या मर्डर केसचा उलगडा करण्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर धोका असताना पोलिसांनी माझ्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे ही त्याहून चिंताजनक बाब आहे. जर सिस्टीम एखाद्या सेलिब्रिटीची सुरक्षा मजबूत करण्यासाठी रॅली काढू शकते. तर मला सलमान खानसारखे संरक्षण का दिले गेले नाही. कारवाईवरील विसंगती आपल्या न्याय व्यवस्थेच्या निष्पक्षता आणि परिणामकारकतेबद्दल चिंता निर्माण करते. सामाजिक स्थिती किंवा सेलिब्रिटी असा विचार न करता सुरक्षिततेला प्राधान्य देणे महत्वाचे आहे,” असे तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले आहे.


फेसबुक लाईव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या

दरम्यान, दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर या आहेत. अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक होते. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबूक लाईव्ह दरम्यान गोळ्या झाडून निर्घुण हत्या करण्यात आली होती. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या होत्या. मॉरिस नोरोन्हा यानंही स्वतःवर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती.