| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२५ एप्रिल २०२४
राहुल गाधींनी देशवासीयांच्या संपत्तीचे सर्वेक्षण करण्याबाबतच्या आपल्या वक्तव्यावरुन युटर्न घेतला आहे. याबाबत कारवाई करण्याबद्दल मी बोललो नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील जनतेच्या संपत्तीचे सर्वेक्षण करून घेण्याचे राहुल गांधी यांनी याआधी म्हटलं होतं. यासोबतच या संपत्तीचे पुनर्वितरण केले जाईल, असेही म्हटले होते. पण आता त्यांनी आपल्या वकतव्यावरुन माघार घेतली आहे.
काँग्रेसने दिल्लीतील जवाहर भवनात आयोजीत कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या संपत्ती सर्वेक्षण आणि पुनर्वितरण याबाबत स्पष्टीकरण दिले. आम्ही कारवाई करु असे मी अद्याप बोललेलो नाही असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. फक्त कोणावर अन्याय होत आहे का हे जाणुन घेण्यासाठी हे सर्वेक्षण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
आपल्या मागिल वक्तव्यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की देशातील जनतेच्या संपत्तीचे सर्वेक्षण करुन मुख्य समस्या समोर येईल. आणि मालमत्तेच्या पुनर्वितरणासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात राहुल गांधींनी जात जनगणनेबाबत चर्चा केली. ते म्हणाले, हे माझ्यासाठी राजकारण नाही. हे माझ्यासाठी जिवनाचे एक मिशन आहे. कोणतीही शक्ती मला जात जनगणना करण्यापासुन रोखु शकत नाही असंही ते पुढे म्हणाले.
काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनीही याविषयी बोलताना म्हटले की अमेरिकेत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सरकार त्याची ५५ टक्के संपत्ती घेते आणि हे योग्य आहे. काँग्रेस पक्षाने मात्र सॅम पित्रोदांच्या या वक्तव्याला त्यांचे वैयक्तीक मत असे म्हटले आहे. यावर प्रतिक्रीया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की काँग्रेसची निती जीवनासोबत आणि जीवनानंतरही जनतेला लुटण्याची आहे.