| सांगली समाचार वृत्त |
वाळवा - दि.२९ एप्रिल २०२४
गाईच्या दुधाचे प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान एका शुन्यामुळे अडल्याचा प्रकार घडला आहे. अनुदानासाठी अर्ज भरताना एक्सेल शिटमध्ये बॅंक खात्यातील शून्य नोंदविता आले नाही, त्यामुळे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.
ऑनलाइन चुकांचे अनेक अडथळे पार करताकरता शेतकऱ्यांची पुरती दमछाक होत आहे. अनुदानासाठी दूध उत्पादकांची, उत्पादनाची माहिती संकेतस्थळावर भरावी लागते. त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक, जनावराचा टॅगिंग क्रमांक आदी माहिती एक्सेल शीटमध्ये भरून शासनाकडे पाठवावी लागते. डेअरी चालकांनी ही माहिती शासनाकडे तपासणीसाठी पाठवली, मात्र त्यातील अनेक शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी निघाल्या आहेत. ज्या दूध उत्पादकाचा बॅंक खाते क्रमांक शुन्याने सुरु होतो, त्यांचे प्रस्ताव लटकले आहेत. एक्सेल शीटमध्ये सुरुवातीला शून्य नोंदवता आले नाही. जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याच्या माहितीमध्ये शून्य लिहायचा राहून गेला आहे. त्यामुळे हजारो उत्पादकांची अनुदानाची माहिती एका शून्यामुळे अडकून पडली आहे.
प्रस्तावामध्ये जनावरांचे टॅगिंग क्रमांक, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक यातील अनेक चुकांची दुरुस्ती त्या-त्यावेळी करण्यात आली, पण या शुन्याचा निकाल कसा लावायचा? याचे कोडे डेअरी चालकांना आणि शेतकऱ्यांना सुटलेले नाही. त्यामुळे त्यांना अनुदान मिळण्यात अडचणी येत आहेत.
संगणक शून्य घेईना
एक्सेलमध्ये माहिती भरताना संगणक सुरुवातीला शून्य घेत नसल्याचे अनुभव आहेत. पण बॅंकांचे खाते क्रमांक शुन्याने सुरु होत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. शून्य नसल्याने खाते क्रमांक सदोष दिसून येते, परिणामी अनेकांच्या अनुदानाच्या रकमा खात्यांवर जमा झालेल्या नाहीत.
दुरुस्तीची कार्यवाही
यासंदर्भात संबंधित अधिकारी गोपाळ करे यांनी सांगितले की, शुन्याने सुरु होणाऱ्या बॅंक खाते क्रमांकाची दुरुस्ती करण्याची कार्यवाही सुरु आहे. अपूर्ण दिसणारे खाते क्रमांक लवकरच दुरुस्त होतील, त्यानंतर अनुदानाच्या रकमा दूध उत्पादकांच्या खात्यांवर जमा होतील.