yuva MAharashtra बच्चू कडू यांना आलेल्या धमकीच्या पत्रामुळे राज्यात खळबळ

बच्चू कडू यांना आलेल्या धमकीच्या पत्रामुळे राज्यात खळबळ



सांगली समाचार- दि. ४ एप्रिल २०२४
अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महायुतीमध्ये अमरावतीच्या जागेवर वाद सुरू आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांच्याविरोधात उमेदवार मैदानात उतरवणार हे निश्चित झालं आहे. अशातच आज बच्चू कडूंना, तुमच्या केजरीवाल करू अशी धमकीच देण्यात आली आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना धमकी देण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. "जास्त उडउड करू नको, तुलाही केजरीवाल सारखं जेलमध्ये टाकेल,नाही तर उडवून टाकेल' अशी चिठ्ठी सापडली आहे. प्रहार जन शक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना उघडपणे धमकी देण्यात आली आहे.

आज नेहरू मैदानात अज्ञात इसमा कडून गर्दीत ही चिठ्ठी मिळाली आहे. या चिठ्ठीमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही चिठ्ठी कुणी आणि का लिहिली याबद्दल अजून माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मैदानातील सीसीटीव्ही फुटेजः च्या आधारे तपास सुरू आहे.


बच्चू कडू यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन

दरम्यान, बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षातर्फे दिनेश बुब यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. दिनेश बूब त्यांच्यासाठी अमरावतीच्या नेहरू मैदानात प्रचार सभा पार पडली. सभे नंतर बच्चू कडू आमदार राजकुमार पाटील व दिनेश बूब हे शक्ती प्रदर्शन करत खुल्या जीपवर बसून नेहरू मैदान ते इरविन चौकच्या दिशेने रवाना झाले होते. जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला त्यानंतर इरविन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पणकरून तिथून बच्चू कडू आमदार राजकुमार पटेल आणि दिनेश बुब जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवडणूक अर्ज दाखल केला.

एकाचं डिपॉझिट जप्त करायचे आहे, बच्चू कडूंचा राणांवर निशाणा

पुढचे 20 दिवस स्वतःला झोकून टाका, कार्यकर्त्यांनी खिशातले पैसे खर्च केल्या शिवाय निवडणूक लढता येणार नाही. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. ही ज्वाला पेटत ठेवा.उद्याचा दिवस तुरुंगाची पायरी चढायची गरज पडू शकते अशी सरकारची अवस्था आहे. मी केवळ पाच हजार मताने लोकसभेत पडलो होतो ते स्वप्न दिनेश बूब पूर्ण करणार आहे, असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला.

'ही लढाई सर्वांची आहे. आमचा खासदार दिनेश बुब दिल्लीत लढल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी,मजुरांची ताकद निर्माण झाली पाहिजे. हार कुठल्याही परिस्थितीत होऊ नये, एकाचं डिपॉझिट जप्त करायचे आहे, असं म्हणत बच्चू कडूंनी राणांवर निशाणा साधला.