| सांगली समाचार वृत्त |
माढा - दि.१९ एप्रिल २०२४
कडाक्याचं ऊन आणि त्यात तापत असणारं राजकारण, अशा संमिश्र वातावरणात उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज भरत आहेत. विशेष म्हणजे विविध पक्षांचे उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने आपला अर्ज भरत आहेत. काही उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरत असताना मोठमोठी रॅली काढली जात आहे. या रॅलीतून प्रचंड शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. काही उमेदवारांसाठी महायुतीचे नेते मोठमोठ्या जंगी सभा घेत आहेत. या सभांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसारखे दिग्गज नेते उपस्थिती लावत आहेत. विशेष म्हणजे फक्त सत्ताधारीच नव्हे तर विरोधकही याबाबतीत मागे नाहीत. विरोधकांकडून उमेदवारी अर्ज भरताना रॅली काढली जात आहे, सभा घेतली जात आहे, प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. या सगळ्या दरम्यान माढ्यातल्या एका उमेदवाराने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वळवलं आहे. यामागे कारणही अगदी तसंच आहे. हा उमेदवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाला तेव्हा तो चक्क रेड्यावर बसून आला. त्याने यमाचा पोशाख परिधान केलेला होता.
आपण विविध पक्षांच्या नेते आणि उमेदवारांसाठी यम आहोत, असा दावा या उमेदवाराने केला. या यमाचं म्हणजे उमेदवाराचं नाव राम गायकवाड असं आहे. ते मराठा समाजाचे राज्य समन्वयक आहेत. राम गायकवाड यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी उपरोधिकपणे यमाचं रुप धारण केलं. ते थेट रेड्यावर बसून उमेदवारी अर्ज दाखल करायला आले. त्यांचा यामागचा काय उद्देश होता? ते जाणून घेतलं तर त्यांच्याबद्दलचा आदर कदाचित वाढू शकतो. त्यांनी आपण या अशा प्रकारचा पोषाक परिधान करुन का आलो ? याचं खूप सुंदर असं उत्तर दिलं. पण तरीही माढ्याची जनता त्यांना कितपत मतदान करते? हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण त्यांच्या स्पर्धेत महायुती आणि महाविकास आघाडीचे मातब्बर उमेदवार आहेत.
राम गायकवाड यांची नेमकी भूमिका काय?
“अहो या देशामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, राजकीय पुढाऱ्यांची मग्रुरशाही, हे देवाधिकांना घाबरत नाहीत. ही सगळी लोकं आता फक्त यमाला घाबरणार म्हणून आम्ही यमाच्या अवतारात आलो आहोत. यम हा शेवटचा टोक असतो. या यमाच्या शेवटच्या टोकावर आम्ही इथे आलो आहोत. आम्ही आज लोकसभेत यमाला घेऊन जाणार आहोत. भ्रष्टाचारी लोकांना संपविण्यासाठीच आम्ही यम म्हणून आलेलो आहोत”, असं स्पष्टीकरण राम गायकवाड यांनी दिलं.
“आम्ही आज यमाचं वाहन म्हणजे रेडावर बसून आलेलो आहोत. या देशाचा बोकाळलेला भ्रष्टाचार, आमचं मराठा आरक्षण दिलं नाही. वारंवार आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. कुठलंही सरकार येऊद्या, हे सरकार फक्त सत्ता, स्वार्थ आणि भ्रष्टाचार, नोट याच्यासाठी आहे”, अशी टीका राम गायकवाड यांनी केली.
माढ्यात काँटे की टक्कर
माढा लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर आहे. भाजपकडून या मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीला भाजपमधील मोहिते पाटील गटाचा विरोध होता. त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबाने पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांनी या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवार तितक्याच ताकदीचे आहेत. त्यामुळे माढ्यात खरी लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे.