yuva MAharashtra 'हाय हाय गर्मी !' बर्फाची टोपी, अंगावर एसी; भविष्यात असा असेल का उन्हाळा ?

'हाय हाय गर्मी !' बर्फाची टोपी, अंगावर एसी; भविष्यात असा असेल का उन्हाळा ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.१५ एप्रिल २०२४ -
वाढते प्रदूषण, लोकसंख्या व पर्यावरणाची हानी या सर्वांचा भयंकर परिणाम आपल्या हवामानावर होत आहे. यंदा आपल्या देशातील अनेक शहरांनी मे महिन्याआधीच उष्णतेचा उच्चांक गाठला आहे. अशामध्ये गरम हवेतून आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी, उन्हाचा सामना करण्यासाठी आपण एसी, कूलर व पंख्याचा वापर करतो. तसेच, शरीराला आतून थंडावा देण्यासाठी थंडगार बर्फाचा उपयोग करतो.

मात्र, अशा तीव्र उन्हात प्रवास करताना 'पॅरलल जगात' एसीसमोर बसण्याऐवजी कोणत्या पर्यायाचा वापर केला जाऊ शकतो याचे AI निर्मित भन्नाट फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पॅरलल जग म्हणजेच समांतर किंवा इथे आभासी जग म्हणता येईल. अशा जगात तीव्र उन्हाचा नेमका कसा सामना केला गेला आहे हे दाखविणारे एकूण १० फोटो आहेत, ते पाहू.


AI निर्मित फोटोमध्ये बर्फाचा वापर

पहिल्या फोटोमध्ये एका वृद्ध महिलेने आपल्या डोक्यावर चक्क बर्फाचे खडे असलेली कानटोपी घातलेली आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये एक तरुणी बर्फाची स्कूटर चालवीत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सहाव्या फोटोमध्ये एक तरुण आणि एक काळ्या रंगाचा गॉगल लावलेली म्हातारी आजीबाई रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या बर्फाच्या सोफ्यावर बसलेले आहेत.

AI निर्मित फोटोंमध्ये कूलर आणि पंख्याचा वापर

दहा फोटोंपैकी तिसऱ्या फोटोमध्ये एका व्यक्तीने चक्क लहान आकाराचे १०-१५ पंखे एकमेकांमध्ये ओवून त्याचाच शर्ट म्हणून वापर केला आहे. तर, नवव्या फोटोमध्ये एका रिक्षाचालकाने डोळ्यांना दोन पंखे बसवलेला गॉगल लावला आहे. शेवटच्या दहाव्या फोटोमध्ये एका बाईने हातामध्ये मोठी छत्री धरली असून, त्या छत्रीला सगळीकडून टेबल फॅन्स जोडण्यात आलेले दिसतात.

चौथ्या फोटोमध्ये एका व्यक्तीने डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर झाकणारा एसी आणि आणि कूलर यांच्या साह्याने बनविलेला सूट घातलेला आहे. तर पुढच्याच फोटोमध्ये एका तरुणाने फॅशन म्हणून आपल्या पायांना पंखे जोडले आहेत. अर्थात, उन्हाळ्याने प्राणीही अस्वस्थ होतात. त्यामुळे १०-१२ कुत्र्यांची टोळी एका मोठ्या कूलर आणि त्यावर ठेवलेल्या एसीची हवा खात जमिनीवर बसल्याचे दृश्य आठव्या फोटोमध्ये पाहायला मिळते. तर शेवटी सातव्या फोटोमध्ये एक अवाढव्य आकाराचा कूलर टेम्पोमध्ये ठेवल्याचे आपण पाहू शकतो.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @sahixd नावाच्या अकाउंटकडून हे AI द्वारे तयार केलेले फोटो टाकण्यात आले आहेत. नेटकऱ्यांच्या त्यावरील काही निवडक प्रतिक्रिया पाहू.

'झाडे वाचवा', असा संदेश एकाने दिला आहे.
'उष्णता घालवण्याचे भन्नाट उपाय', असे दुसऱ्याने लिहिले आहे.
'हे अगदीच शक्य आहे', असे तिसऱ्याने म्हटलेय.
'सध्याची परिस्थिती आहे ही', ते चौथा म्हणतो आहे.

आपले भविष्य खरेच असे असू शकते का? भविष्यात उन्हाळ्याचा सामना खरेच अशा पद्धतीने करावा लागू शकतो का, अशा स्वरूपाच्या प्रश्नांवर विचार करायला हे १० फोटो भाग पडतात. @sahixd नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या या फोटोंना आतापर्यंत ३०१K इतके लाइक्स मिळाले आहेत.