सांगली समाचार - दि -६ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी तिहार तुरुंगात बाहेर आल्यानंतर शुक्रवारी पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केंद्रातील भारतीय जनता सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मद्य घोटाळा भाजपनेच केला असून यात भाजपचे सर्वोच्च नेतृत्व सामील असल्याचा गंभीर आरोप संजय सिंह यांनी केला.
अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आंध्र प्रदेशमध्ये एनडीएकडून तिकीट मिळालेल्या मगुंटा रेड्डी यांनी तीन जबाब दिले असून त्यांचा मुलगा राघव एम. रेड्डी याने सात जबाब दिले आहेत. नऊ जबाबात त्यांनी केजरीवाल यांचे नावही घेतले नाही, असा दावा सिंह यांनी केला.
16 सप्टेंबर 2022 रोजी वायएसआर खासदार रेड्डी यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी केजरीवाल यांचे नाव घेतले नाही. फेब्रुवारी 2023मध्य़े त्यांचा मुलगा राघव एम. रेड्डी याला अटक करण्यात आली. त्यानेही सात पैकी सहा जबाबांमध्ये केजरीवाल यांचे नाव घेतले नाही. मात्र 5 महिन्यांच्या छळानंतर राघव रेड्डी याने केजरीवाल यांच्याविरोधात जबाब दिला, असा आरोप संजय सिंह यांनी केला.
संजय सिंह यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मगुंटा रेड्डी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक फोटोही दाखवला. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात आरोपी बनवण्यात आलेल्या मगुंटा रेड्डी यांच्यासोबत पंतप्रधान काय करताहेत? असा सवाल सिंह यांनी केला. याच रे़ड्डी यांना आंध्र प्रदेशमध्ये एनडीएतील घटकपक्ष टी़डीपीने लोकसभेची उमेदवारी दिली असून ते मोदींचा फोटो दाखवून आता मतं मागत आहेत, असेही सिंह म्हणाले.
मनिष सिसोदिया यांचे तिहार तुरुंगातून समर्थकांना पत्र
संजय सिंह यांनी या पत्रकार परिषदेमध्ये शरदचंद्र रेड्डी यांचेही नाव घेतले. शरदचंद्र रेड्डी यांचेही 12 जबाब नोंदवले गेले. सुरुवातीला त्यांनी केजरीवाल यांना आपण ओळखतही नसल्याचे म्हटले. ते 6 महिने तुरुंगात राहिले. मात्र केजरीवाल यांच्याविरोधात साक्ष देताच त्यांना जामीन मिळाला. भाजप ज्याला घोटाळेबाज म्हणत होती त्याच रेड्डीकडून त्यांनी 55 कोटींचे निवडणूक रोखेही घेतले, असा आरोपही संजय सिंह यांनी केला.