आमची शेतकरी चळवळ ही जनतेच्या कल्याणासाठी आहे. विरोधकांकडून या निवडणुकीत पैशांची मुक्त उधळण सुरू आहे. साखर कारखान्यांच्या रिकव्हरीतून व वजनात काटा मारून पैशांची लूट अनेक साखर कारखान्यांनी केली आहे.
तोच बाजूला काढलेला पैसा सध्या लोकसभा निवडणुकीत कारखानदार माझ्या विरोधात खर्च करत आहेत. शेतकऱ्यांच्या वजनात काटा मारणारे महाभाग लोकसभा निवडणुकीत सत्यजीत पाटील यांचा प्रचार करत फिरत आहेत. शेतकरी या निवडणुकीत काटामारी करणाऱ्या साखर कारखानदारांना धडा शिकवतील.
गेल्या तीन निवडणुकांचा प्रचार शुभारंभ मी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावी येडेमच्छिंद्र येथे करत आलो आहे. यंदाही याचा गावात मी प्रचाराचा नारळ फोडणार आहे. २४ एप्रिल पासून मी माझ्या प्रचारास सुरूवात करत आहे. साखर कारखानादार विरूध्द शेतकरी अशी ही निवडणूक होणार आहे.
गावगाडा नेहमीच जिंकत आला आहे. संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. म्हणून मी ही चळवळ करतोय. यासाठी मी शेतकरी चळवळशी प्रामाणिक आहे. शेतकरी, कष्टकरी जनतेला मला न्याय द्यायचे आहे. त्यांचे चेहऱ्यावर हास्य फुलवायचे आहे.
शेती उद्ध्वस्त होत आहे. गावाकडची माणसे शहराकडे वळू लागलेली आहेत. शेतकऱ्यांनो जमिनी अजिबात विकू नका. शेती आपली आई आहे. या जमिनीवर आपण जीवापाड प्रेम करतोय. गावांची प्रगती करायची असेल तर शेती सुधारली पाहिजे, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. त्यासाठी अजून खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
यावेळी एल्.आर.पाटील, जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, तालुकाध्यक्ष भागवत जाधव, प्रकाश देसाई, गोपिचंद पाटील, जालिंदर पाटील, शिवाजी पाटील, एस. यु. संदे, उत्तम देसाई, जालिंदर देसाई, संदीप राजोबा, साहेबराव पाटील, संजय बेले, आकाश साळुंखे, प्रदीप पाटील, मानसिंगराव पाटील, शिवाजी मोरे, प्रभाकर पाटील, जगन्नाथ भोसले आदी उपस्थित होते.
" जयंतरावांनी एक कर्मचारी माझ्या भेटी गाठींचा तपशील नोंदविण्यासाठी माझ्याबरोबर द्यावा. : शेट्टी दिवसभरात साखराळे ते शिरटे गावाचा संपर्क दौरा करत असताना राजारामबापू उद्योग समूहातील कर्मचारी राजु शेट्टी कुठे कुठे जातात,
भेटतात याची टेहळणी करण्यासाठी कामाला लावले जात आहेत. तसे न करता जयंतरावांनी एक कर्मचारी माझ्या भेटी गाठींचा तपशील नोंदविण्यासाठी माझ्याबरोबर द्यावा. असे भर सभेत आव्हान करून शेतकरी आता दबाव तंत्राला जुमानत नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.