| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि.२६ एप्रिल २०२४
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपची साथ सोडून गेलेल्या भाजपच्या ४ माजी नगरसेवकांवर कारवाई करावी, अशा आशयाचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार आहे', अशी माहिती भाजपचे महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश ढंग यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, भाजपचे ८ आणि महायुतीचे ३, असे ११ माजी नगरसेवक एकत्रच आहेत. महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रसारासाठी ते कार्य करत आहेत. संजयकाकांना अधिकाधिक मताधिक्य दिले जाणार आहे. 'मिरज पॅटर्न'च्या नावावर ४ माजी नगरसेवकांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. भाजपच्या नगरसेवकांमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी व्यय केला आहे. त्यामुळे संजयकाका पाटील यांना अधिकाधिक मताधिक्य मिळेल. ४ माजी नगरसेवक गेल्यामुळे संजयकाका यांच्या विजयामध्ये फरक पडणार नाही.
सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी आवेदन कायम ठेवले !
येथील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष आवेदन कायम ठेवल्याने त्यांचे मन वळवण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची शिष्टाई अयशस्वी ठरली आहे. सांगली लोकसभा जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी आवेदन विशाल पाटील यांनी मागे घेतलेले नाही. त्यामुळे सांगली लोकसभेला तिरंगी लढत अटळ झाली आहे.
'विशाल पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल', असे संकेत काँग्रेस पक्षाने दिले आहेत. त्यामुळे आता काँग्रेस काय कारवाई करणार ? याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.