yuva MAharashtra प्राणघातक हल्ल्याचा आरोपी कुंडलिक खांडे पंकजा मुंडेंच्या प्रचारात

प्राणघातक हल्ल्याचा आरोपी कुंडलिक खांडे पंकजा मुंडेंच्या प्रचारात



| सांगली समाचार वृत्त |
बीड - दि.२० एप्रिल २०२४
आपल्याच गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल असलेला शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे याचा बीडचे तपास तरबेज पोलीस दोन आठवड्यांपासून शोध घेत आहेत. खांडेच्या शोधासाठी पोलिसांची पथके राज्यभरात पाठवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र काखेत कळसा अन् गावाला वळसा असेच पोलिसांचे झाले आहे. कुंडलिक खांडे हा भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारात दंग असून, रॅली, सभांमध्ये तो दिसून येत आहे. गृहखात्याचे संरक्षण मिळाल्यामुळेच खांडे राजरोस फिरत असल्याने बीडकरांमध्ये मात्र संताप व्यक्त होत आहे.


दहा दिवसांपूर्वी शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे हे म्हाळसजवळा गावाकडे जात असताना खंडेश्वरी मंदिराजवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ज्ञानेश्वर खांडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी त्यांना दुसर्‍या रुग्णालयात पाठवण्यात आले. ज्ञानेश्वर खांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह अकरा जणांविरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
गुन्हा दाखल झाल्यापासून बीड पोलीस कुंडलिक खांडेसह अकरा जणांचा शोध घेत आहेत. कुंडलिक खांडे यांच्या शोधासाठी राज्यभरात पोलीस पथके रवाना करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र या पथकांनी कुठे पर्यटन केले माहिती नाही, पण एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.

कुंडलिक खांडे मुंडेंच्या व्यासपीठावर
कुंडलिक खांडेसह अकरा जणांच्या शोधासाठी पोलीस भर उन्हात वणवण करत आहेत. मात्र बगल में बच्चा… अशी अवस्था पोलिसांची झाली आहे. कुंडलिक खांडे हा भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारात दंग आहे. मुंडे यांच्यासोबत ठिकठिकाणी व्यासपीठावर त्याला पाहण्यात आले. प्राणघातक हल्ल्यातला आरोपी राजरोसपणे भाजपच्या व्यासपीठावर वावरताना दिसत असूनही पोलिसांना मात्र सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.