yuva MAharashtra महाकाय तुळईने सांधणार मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग

महाकाय तुळईने सांधणार मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२६ एप्रिल २०२४
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी असा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी एक आव्हानात्मक टप्पा गाठणार आहे. मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) शुक्रवारी पहाटे प्रवाहकीय हवामानानुसार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या आव्हानात्मक मोहिमेसाठी साधारणपणे पाच ते सहा तासांचा अवधी लागणार असून यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि तांत्रिक पथक सज्ज आहे. 

मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच नरिमन पॉइंटपासून वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिके कडून मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात येत आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका दिनांक ११ मार्च २०२४ पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यानंतर आता मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाचे वरळीकडील टोक जोडण्यात येणार आहे. त्यासाठी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी प्रवाहकीय हवामानानुसार स्थापन करण्यात येणार आहे. 

ही तुळई (गर्डर) नवी मुंबईतील न्हावा बंदरातून प्रवास करीत वांद्रे-वरळी सागरी सेतू ज्या ठिकाणी मुंबई किनारी रस्त्याला जोडला जाणार आहे, तिथपर्यंत पोहोचली आहे. अडीच हजार मेट्रीक टन वजन असलेल्या बार्जवरून ही तुळई आणली आहे. यानंतर मे २०२४ अखेरपर्यंत उत्तर वाहिनी दुसरी मार्गिकेची तुळईची देखील जोडणी करण्यात येणार आहे. ही दुसरी तुळई सध्या न्हावा बंदरात आहे. शुक्रवारी पहिली तुळई जोडल्यानंतर दुसरी तुळई आणून नंतर जोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

अशी आहे पहिली तुळई-

पहिली तुळई ही वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात येणार आहे. ही तुळई दोन हजार मेट्रीक टन वजनाची आहे. तसेच १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद आहे. जॅकचा वापर करून स्थापन केली जाणारी ही तुळई वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि मुंबई किनारी मार्गाच्या नरिमन पॉईंटकडे जाणाऱ्या बाजूला सांधणार आहे. 

मे महिन्यात दुसऱ्या तुळईची स्थापना-

मुंबई किनारी मार्गावरून वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गावर दुसरी तुळई देखील स्थापन करण्यात येणार आहे. ही दुसरी तुळई अडीच हजार मेट्रीक टन वजनाची आहे. तसेच १४३ मीटर लांब आणि २६ ते २९ मीटर रुंद आहे. ही तुळई स्थापन केल्यानंतर मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू पूर्णपणे जोडले जाणार आहेत. 

निरनिराळ्या टप्प्यांवर घेतली खबरदारी-
देशामध्ये प्रथमच समुद्रामध्ये १३६ मीटर लांबीचा बो स्ट्रिंग आर्च गर्डर (तुळई) बसविण्यात येत आहे. जगात अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आल्याच्या घटना अत्यंत मोजक्याच आहेत. वरळी येथील क्लिव्हलँड जेट्टीमधून मच्छीमारांच्या नौकानयन मार्गात व्यत्यय येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी मोजक्याच सुट्या भागांचे (प्री-फॅब्रिकेटेड) पुलाचे नियोजन व बांधकाम करण्यात आले आहे. ही बांधकामप्रणाली अवलंबत समुद्र व पर्यावरण घटकांना कमीत कमी अडथळा निर्माण होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. या पुलाला समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून व दमट वातावरणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सी-५ गुणवत्ता असलेले गंजविरोधक रंगकाम केले आहे.

मुंबई किनारी प्रकल्पाविषयी-

एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे. तसेच अमरसन्स, हाजी अली व वरळी येथे आंतरबदल मार्गिका अर्थात इंटरचेंज आहेत. तसेच दक्षिण-उत्तर मुंबईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रत्येकी २ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र भूमिगत जुळे बोगदे करण्यात आले आहेत. या बोगद्यात सहा व इतर ठिकाणी ८ मार्गिका आहेत. या बोगद्यांना तब्बल ३७५ मिमी जाडीचे काँक्रिटचे अस्तर आहे. या बोगद्यांमध्ये भारतात प्रथमच वापरात येत असलेली अत्याधुनिक सकार्डो ही वायूविजन प्रणाली आहे. आपत्कालीन उपाययोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर १० छेद बोगदे देखील आहेत. तसेच या प्रकल्पातून ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मिती केली जात आहे.