| सांगली समाचार वृत्त |
परभणी - दि.२२ एप्रिल २०२४
"आजोबांशी उभा दावा, नातवाबरोबरीने सभा; चाणक्यंवर उलटली त्यांच्याच राजकारणाची तऱ्हा", असं म्हणायची वेळ शरद पवारांच्या राजकारणाने त्यांच्यावर आणली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातले ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी राजेश टोपे यांच्या घनसावंगी मध्ये सभा घेतली. या सभेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शरद पवारांच्या बरोबरीने उपस्थित होते. संजय जाधव आणि राजेश टोपे यांनी शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांचा काठी आणि घोंगडे देऊन एकत्र सत्कार केला. आदित्य ठाकरे यांना व्यासपीठावर शरद पवारांच्या बरोबरीचे स्थान दिले. इथेच नेमकी "आजोबांशी उभा दावा, नातवाबरोबर घ्यावी लागली सभा, चाणक्यांच्या राजकारणाची उलटली तऱ्हा", अशी स्थिती आली.
बाकी ठाकरे पवारांनी त्या भाषणामध्ये मोदींवर हल्लाबोल केला. राज्यघटना वाचवण्यासाठी मोदींना हटवले पाहिजे अशा बाता केल्या. ही भाषणे वगैरे ठीक झाली. पण मुळात शरद पवारांच्या बरोबरीने आदित्य ठाकरेंना स्थान मिळाले. किंबहुना शरद पवारांना ते स्थान मान्य करावे लागले, इथेच खरी राजकीय गोम दडली आहे.
शरद पवारांनी आपल्या राजकीय आयुष्यात बाळासाहेब ठाकरे यांच्याशी उभा दावा मांडला होता. 1990, 1995 ते 2012 पर्यंत महाराष्ट्रात कायमच बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शरद पवार अशी झुंज झाली. हेच दोन्ही नेते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. बाकीच्या सगळ्या पक्षांचे सगळे नेते ठाकरे आणि पवारांच्या तुलनेत दुय्यम आणि तिय्यम स्थानावर होते. ठाकरे विरुद्ध पवार संघर्षात कधी ठाकरेंनी पवारांवर मात केली तर कधी पवारांनी ठाकरे निर्माण केली, पण दोघांची राजकीय कुस्ती अनेकदा बरोबरीतच सुटली. ब्रँड म्हणून ठाकरे हे पवारांच्या पेक्षा कितीतरी मोठे ठरले. ते त्यांच्या हयातीनंतर जास्त मोठे होत गेले, पण पवारांचे मात्र त्यांच्या हयातीत "राजकीय बोन्सॉय" झाले.
2019 मध्ये पवारांनी जो महाविकास आघाडीचा प्रयोग केला, त्यामध्ये सुरुवातीला उद्धव ठाकरेंना त्यांना आपल्या बरोबरीचे स्थान द्यावे लागले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षेच टिकले तरी शिवसेनेचे नेते म्हणून "एस्टॅब्लिश" झाले. शिवसेना फुटून 40 आमदार निवडून गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंचे "ते" स्थान महाविकास आघाडीत तरी डळमळू शकले नाही… आणि 2024 च्या निवडणुकीत तर उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात पवारांवर मात करत पहिले स्थान तर पटकावलेच, पण पवारांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
आता मोदी लाटेत ठाकरे किंवा पवारांचे लोकसभेचे उमेदवार किती निवडून येतील हा भाग अलहिदा, पण जागा वाटपात सिंहाचा वाटा घेऊन उद्धव ठाकरेंनी पवारांवर मात केली ही वस्तुस्थिती विसरता येणार नाही. आणि पवारांचे राजकारणाचा त्यापुढे देखील घसरून आदित्य ठाकरेंना आपल्या बरोबरीचे स्थान व्यासपीठावर द्यावे लागले आहे. संजय जाधव या शिवसेनेच्या उमेदवारासाठी पवारांनी सभा घेणे हा संजय जाधव यांच्यासाठी "क्रेडिट"चा भाग ठरला, पण त्याच सभेत आदित्य ठाकरेंना पवारांना बरोबरीने स्थान द्यावे लागले हे पवारांसाठी मात्र "डिस्क्रेडिट"च ठरले.
पवारांच्या बारामतीत न्यूयॉर्क टाईम्ससारख्या अमेरिकन मीडियाची इंट्री झाली, त्यावेळी पवारांनी आपले कुटुंब कसे एक आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पवारांनी पवार स्वतः केंद्रस्थानी बसून इतर सगळे लोक खाली मांडी घालून बसले. त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार हे देखील होते. आपल्याच घरातल्या या दोन लोकप्रतिनिधींना पवारांनी आपल्या बरोबरीचे स्थान देणे तर सोडाच, पण दूरचे खुर्च्यांवरचे स्थानही दिले नव्हते. त्या उलट बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाला मात्र परभणीतल्या घनसावंगीतल्या प्रचाराच्या जाहीर सभेत पवारांना आपल्या बरोबरीचे स्थान द्यावे लागले. आदित्य ठाकरेंचे "पॉलिटिकल ग्रुमिंग" स्वतः बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी "तसे" केले असेल, तरी पवारांना त्याला मान्यता द्यावी लागली, यात पवारांच्या राजकारणाची उफराटी तऱ्हाच सिद्ध झाली.