yuva MAharashtra मेधा कुलकर्णींनी संस्कृतमधून घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ!

मेधा कुलकर्णींनी संस्कृतमधून घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ!





सांगली समाचार - दि ४ एप्रिल २०२४
नवी दिल्ली  - यंदा राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजपच्या वतीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी, भाजप नेते अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली गेली आणि या तिघांचीही राज्यसभेवर वर्णी लागली. दरम्यान, आज राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी पुण्यातील राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी संस्कृत भाषेमधून राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर त्यांनी आपल्या भावनाही सोशल मीडियावरील पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत.

मेधा कुलकर्णी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, 'मला कळवताना अत्यंत आनंद होत आहे की, आज सभागृहाचे आदरणीय अध्यक्ष, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत मला राज्यसभेची खासदार म्हणून संस्कृतमध्ये शपथ घेण्याचा मान मिळाला. राज्यसभा सदस्य म्हणून मी आज संस्कृत भाषेतून शपथ घेताना खूप भारावून गेले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ही शपथ दिली.'


याचबरोबर 'मी अतिशय कृतज्ञ आहे, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि त्याचबरोबर भाजपचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, संघ पदाधिकारी ज्यांनी मला ही संधी दिली, विश्वास दाखवला. तसेच माझ्यावर प्रेम करणार्‍या सर्व हितचिंतकांची आणि नागरिकांचीही मी ऋणी आहे, ज्यांचे प्रोत्साहन कायम मला मिळत आले आहे,' असंही कुलकर्णी म्हणाल्या आहेत. तसेच 'आज ही शपथ घेताना अनेक दिग्गजांच्या आवाजाचे ध्वनी माझ्या मनात घूमत होते , ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने, प्रतिभेने आणि वक्तृत्वाने या सभागृहावर आपली छाप पाडली आणि म्हणूनच या वास्तूत येऊन मी भारावून गेले. माझ्यामधील क्षमतांचा पूर्णांशाने वापर करून आपल्या प्रिय भारताच्या या अत्युच्च सभागृहात उत्तम कामगिरी करून मातृभूमीच्या वैभवशाली परंपरेत, लौकिकात भर टाकण्याचा प्रयत्न करेन, असे वचन सर्वांसमक्ष देते आहे. जय हिंद!' अशा शब्दांमध्ये मेधा कुलकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.