| सांगली समाचार वृत्त |
वाळवा - दि.२९ एप्रिल २०२४
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली जिल्ह्यातील कामेरी या गावी गेले होते. प्रचारसभा सुरू असताना स्थानिकांनी या गावात राहणारे ज्येष्ठ सिनेकलावंत विलासराव रकटे हे सध्या अत्यंत हलाखीत जीवन जगत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.
विलासराव रकटे यांनी आपल्या कारकिर्दीत 100 हुन अधिक मराठी सिनेमांमध्ये खलनायक व चरित्र भूमिका साकारल्या आहेत, मात्र तरीही पडत्या काळात त्यांच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याचे मुख्यमंत्र्यांना समजले. त्यांनी तत्काळ या गोष्टीची दखल घेऊन त्यांना सन्मानाने सभास्थळी बोलावले. त्यानंतर वैयक्तिकरित्या त्यांना 5 लाख रुपये मदत म्हणून देत असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या मदतीबद्दल सभेनंतर रकटे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील कामेरी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले की, आपले सरकार निधी देताना कुठलाही जातीभेद करत नाही, जातीवाद करत नाही. इथे मंदिर आणि मशिद एकत्र आहेत. हे देशाला आणि राज्याला दाखवण्यासारखे उदाहरण आहे. मुस्लिम समाजाला केवळ मतांसाठी वापरायचे आणि फेकून द्यायचे हे आपण करणार नाही. जात पात न बघता या समाज हिताचे निर्णय या सरकारने घेतले, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन १० टक्के आरक्षण दिले. कामेरी गावातील हजारो वर्षांपूर्वीचे भवानी मातेच्या मंदीराच्या विकासासाठी निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यावेळी कामेरी गावात राहणारे ज्येष्ठ सिनेकलावंत विलासराव रकटे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वैयक्तिकरित्या 5 लाख रुपयांची मदत करण्यात आली.
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिराळा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. तुमचा शिराळा डोंगराळ भाग तसे माझेही जन्मगाव डोंगराळ भागात आहे. त्यामुळे डोंगरी भागाच्या समस्यांची मला जाणीव आहे. डोंगरी भागामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी धैर्यशील माने यांना खासदार म्हणून पाठवले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले. आपल्या सरकारमध्ये कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.