Sangli Samachar

The Janshakti News

गांधींच्या जावयाने फोडला काँग्रेसला घाम



सांगली समाचार - दि. ८ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - जावई हा दशम ग्रह असल्याचे म्हटले जाते, याचा अनुभव पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वाला विशेषत: गांधी घराण्याला येत आहे. गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी अमेठी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. उत्तरप्रदेशातील अमेठी आणि रायबरेली हे गांधी घराण्याचे मतदारसंघ समजले जातात. अमेठीत 2019 मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पराभव केला. यावेळी पुन्हा एकदा भाजपाने इराणी यांना अमेठीतून उमेदवारी ., गेल्या काही दिवसांपासून इराणी तिथे प्रचारालाही लागल्या आहेत.

या मतदारसंघातून पुन्हा एकदा राहुल गांधी निवडणूक लढवतील, अशी अपेक्षा होती. पण, काँग्रेसने या मतदारसंघातील आपल्या उमेदवाराची घोषणा केली नाही. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांनी आपण अमेठीतून निवडणूक लढणार, असे जाहीर केले नाही, त्याचप्रमाणे तिथून निवडणूक लढणार नाही, असेही म्हटले नाही. अशीच स्थिती रायबरेली मतदारसंघाची आहे. यावेळी येथून निवडणूक लढवायला सोनिया गांधी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव नकार दिला आणि राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे त्या राज्यसभेत पोहोचल्याही. सोनिया गांधींच्या जागेवर रायबरेलीत काँग्रेस महासचिव प्रियांका वढेरा निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. पण, काँग्रेसने प्रियांका वढेरा यांना उमेदवारी जाहीर केली नाही. विशेष म्हणजे, आपण रायबरेलीतून निवडणूक लढणार की नाही, हे सुद्धा प्रियांका वढेरा यांनी सांगितले नाही. काँग्रेस पक्षाने अमेठी आणि रायबरेलीत दुसर्‍या कोणाची उमेेदवारीही जाहीर केली नाही. या मुद्यावर गांधी घराण्याने आणि काँग्रेसनेही मौन बाळगले आहे. 


या संधीचा फायदा घेत प्रियांका वढेरा यांचे पती  रॉबर्ट वढेरा यांनी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करीत काँग्रेसमध्येच नाही, तर गांधी घराण्यातही खळबळ उडवून दिली. काँग्रेसने उमेदवारी दिली नाही, तर अन्य पक्षांचेही प्रस्ताव आपल्याजवळ आहे, असे म्हणायलाही त्यांनी कमी केले नाही. रॉबर्ट वढेरा हे अतिशय वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याविरुद्ध अनेक प्रकरणांत केंद्रीय यंत्रणांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली, तर भाजपा त्याचे भांडवल करणार आणि नाही दिली तर वढेरा अन्य कोणत्याही पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढवू शकतात, ही भीती. रॉबर्ट वढेरा यांनी निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस पक्षाची पंचाईत केली आहे. कारण, त्यांना अमेठीतून उमेदवारी दिली तरी काँग्रेसची अडचण आणि नाही दिली तरी अडचण, अशा कोंडीत काँग्रेस सापडली आहे.