सांगली समाचार - दि. २ एप्रिल २०२४
सांगली - मशागत केली, पेरणी झाली, पीक आले, मळणी केली आणि खळ्यावर आलेले पीक घेऊन कुणीतरी पळून गेले, अशी अवस्था जिल्ह्यातील काँग्रेसची झाली आहे. मशागत केली, पेरणी झाली, पीक आले, मळणी केली आणि खळ्यावर आलेले पीक घेऊन कुणीतरी पळून गेले, अशी अवस्था जिल्ह्यातील काँग्रेसची झाली आहे. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे पक्षाने काँग्रेसची हक्काची जागा जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात न घेता काढून घेतल्याचा आरोप करत काँग्रेसकडून जागा मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे.
आमदार विश्वजित कदम यांच्यासह प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसमोर ते आव्हान उभे आहे. या घडामोडींत पुढील दोन दिवस महत्त्वाचे आहेत. शिवसेनेच्या दबावापुढे झुकायचे नाही, असा निर्धार काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी केला आहे. त्याला राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे पाठबळ मिळाल्याचे सांगण्यात येते. खासदार राहुल गांधी यांनी या वादात अद्याप लक्ष घातलेले नाही, मात्र मुंबईत दोन दिवसांत यावर खल होणार आहे.
शिवसेनेकडून जागावाटपाचा, अदलाबदलीचा विषय कधीच संपल्याचे सांगितले जात होते. काल दिल्लीत ठाकरेंनी काही मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार असल्याचे संकेत दिले असल्याची माहिती काँग्रेसच्या गोटातून मिळाली. त्यामुळे बुधवारी (ता. ३) महाविकास आघाडीची एकत्रित यादी जाहीर करण्यापूर्वी यावर चर्चा होऊ शकते. दरम्यान, आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील मुंबईत तळ ठोकून आहेत. महाविकास आघाडीच्या एकूण चर्चांमध्ये सांगलीचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे.
शिवसेनेला माघार घ्यायची नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी संपूर्ण तयारी असल्याचे प्रदेश आणि राष्ट्रीय नेतृत्वाला पटवून देण्यात आले आहे. त्याचे पडसाद राज्यात अन्यत्र पडायला नकोत, याची काळजी काँग्रेस नेत्यांसह महाविकास आघाडीला आहे, मात्र 'मेरिट'च्या आधारे जागांवर आग्रह धरला पाहिजे, या मुद्द्यावर काँग्रेसने शिवसेनेची कोंडी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात 'मशाल' चिन्ह हवे होते, ते हातकणंगलेत देत आहात, मग सांगलीचा आग्रह कशासाठी, असा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आणला गेला आहे.
ठाकरेंचा शब्द की 'विनिंग मेरिट'?
महाविकास आघाडीचे नेते सांगलीबाबत चर्चेला बसतील, तेव्हा 'ठाकरेंचा शब्द' की 'विनिंग मेरिट' या विषयावर चर्चा होईल, असे सांगण्यात आले. महायुतीची एक जागा कमी करायची आहे की हट्टून एक जागा वाढवून लढायची आहे, याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घ्यावा. त्यावर एकमत झाले नाही तर काँग्रेस मैत्रीपूर्ण लढतीचे धाडस दाखवणार काय, हाच कळीचा मुद्दा आहे.
विशाल पाटलांच्या प्रभाव क्षेत्रात चंद्रहार
दुसरीकडे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी सांगली, मिरज या विशाल पाटील यांच्या प्रभाव क्षेत्रात संपर्क अभियान सुरू केले आहे. विशेषतः काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची ते भेट घेत आहेत. 'जागेचा तिढा सुटेल, मी मैदानात असेल, तुमचा आशीर्वाद आणि साथ असू द्या,' असे आवाहन ते करत आहेत.