| सांगली समाचार वृत्त |
दि.२१ एप्रिल २०२४
भ. महावीरांची जयंती जगभर साजरी होत आहे.ही जयंती केवळ महावीरांची नाही तर हा भारतीय मानवी मूल्यांचा उत्सव आहे. भ. महावीर राजपुत्र होते. त्यांना लहानपणापासूनच वैराग्याची ओढ होती. राजवैभवातील ऐश्वर्याचे आकर्षण त्यांना कधीच विचलित करु शकले नाही. नश्वर देहात ईश्वर प्रकट करण्याची शक्ती माणसात आहे. जगा व जगू द्या हा महामंत्र सहिष्णुता मजबूत करतो. काम, क्रोध, मोह, माया, लोभ हेच खरे शत्रू आहेत. आपला शत्रू आपल्यातच आहे. म्हणून या दुर्गुणापासून मुक्त झाला की आत्मा परमात्मा होऊ शकतो हे महावीरांनी सांगितले आहे. मनुष्यगती दुर्लभ आहे. ती चांगल्या कर्मोदयामुळे मिळाली आहे. त्यामुळे कसलाही प्रमाद करु नकोस कारण एकदा गेलेले आयुष्य इंद्राला देखील परत मिळवता येत नाही हे महावीर वचन आहे.
२६०० वर्षापूर्वी भारतात फार भयानक परिस्थिती होती. अन्याय, अत्याचार, पशुहत्त्या यांनी थैमान घातले होते. यामुळे वर्धमान व्यथीत झाले. हिंसेविरुध्द महावीरांनी बंड केले. शांती व अहिंसक मार्गाने जगा हा संदेश देण्यासाठी त्यांनी भारतभर पायी विहार केला. स्त्रियांना सन्यासाचा अधिकार बहाल केला. जातीभेदाचे उच्चाटन हे त्यांचे महत्वाचे योगदान आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानात प्रत्येक शब्दात भ. बुध्द आणि भ. महावीरांचे प्रतिबिंब आहे.
भ. महावीरांचा लढा हा शोषण व पिळवणूकीविरुध्दचा लढा होता. सगळे मानव समान आहेत. कोणालाही इजा पोहचवू नका.. जगण्याचा अधिकार सर्वांना समान आहे. कोणाचीही कोणाला भिती वाटता कामा नये. निर्भय आणि शांतीमय जीवनाचा पुरस्कार करताना त्यांनी सर्व प्राणीमात्राविषयी मैत्रभाव वाढवण्याचा उपदेश केला. भौतिक साधनसामुग्री ही क्षणभंगुर आहे. सम्यग्दर्शन, ज्ञान व चारित्र्य आणि तप या विहीत मार्गाने गेल्यास व्यक्तीला सद्गती व मुक्ती लाभते हे त्यांचे प्रमुख तत्वज्ञान होते.
आजही भ. महावीरांच्या विचारांची जगाला गरज आहे. जगातील सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी वर्धमानांची वर्तमानाला गरज आहे. भ्रष्टाचार, अत्याचार, खून, दरोडे व सर्व प्रकारच्या हिंसक कारवाया यावर फक्त भ. महावीरांचे जगा आणि जगू द्या हा महामंत्र रामबाण औषध आहे. भ. महावीरांना मंदिरात बंदिस्त करु नका.. त्यांना घराघरात.. मनामनात स्थापित करा.. संसदेत.. विधीमंडळात.. शेतात.. कारखान्यात महावीरांचा वावर वाढला पाहिजे तरच जग सुखी होईल. भोगापासून दूर राहून परोपकार करा. मारक होण्यापेक्षा तारक व्हा.. जीवदया हा खरा धर्म आहे. दुसऱ्यांच्या जगण्यासाठी सहाय्यभूत व्हा. कोणाच्या पोटावर मारु नका.
भ. महावीरांनी भारतीय संस्कृतीला अर्थ प्राप्त करून दिला आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुभाव वृध्दीगंत करणारा विचार महावीरांनी दिला आहे. आत्मचिंतन करा.. ज्ञानसंपन्न व्हा. सर्व धर्मांचा आदर करा. माझाच धर्म महान असा एकांगी विचार करु नका. अनेकांत वाद समजावून घ्या. माझंच खरं, मीच बरोबर असा आततायी विचार करु नका. दुसऱ्याचे अस्तित्व मान्य करणे ही खरी अहिंसा आहे. मनुष्य जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ आहे. म्हणून चांगले कर्म करा. घामाने मिळवलेला पैसा दान धर्मात खर्च करा. शाळा, दवाखाने, अन्नदान यावर खर्च करा..
क्षमावान बना.. क्षमा माणसाला महान बनवते. क्रोध माणसाला लहान बनवते. चांगुलपणा हा खरा अलंकार आहे. कष्ट करुन जगा. महिलांचा सन्मान करा.. भ. महावीरांनी आपल्या संघात महिलांना स्थान दिले होते. त्यांच्या अनुयायामध्ये सर्व जाती जमातीचे लोक होते. ते समतेचे अग्रदूत होते. भ. महावीरांच्या जयंतीदिनी केवळ त्यांची पालखी वाहण्यासाठी खांदे मजबूत असून भागणार नाही तर त्यांच्या विचारांची पालखी वाहून नेण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.
अहिंसक बना, हिंसेला अजिबात थारा देऊ नका, सत्य मार्गाने जगा, खोटेपणा टाळा, चोरी करु नका,स्वाभिमानाने जगण्यासाठी आवश्यक तेवढी संपत्ती जवळ ठेवून बाकिचे दान करा. अपरिग्रही बना, ब्रम्हचर्य पालन करा.. विषयवासनेपासून दूर रहा. ही महावीर वाणी कल्याणाचा मार्ग प्रशस्त करते. सदाचार हे धर्माचे दुसरे नाव आहे. दयेविना धर्म असूच शकत नाही. हा वर्धमान विचार ही भारताची खरी गरज आहे. बालकांवर या विचारांचे संस्कार करणे आणि महावीरांनी सांगितलेला धर्म समजावून घेणे म्हणजे खरी महावीर जयंती होय.
- प्रा. एन. डी. बिरनाळे