सांगली समाचार - दि ७ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता अकरावी आणि बारावीच्या परीक्षेच्या स्वरुपात बदल केला आहे. सीबीएसई दीर्घ प्रश्न उत्तरांऐवजी, संकल्पनावर आधारित प्रश्न उत्तरावर आता लक्ष केंद्रित करणार आहे. या संकल्पना वास्तविक जीवनात विद्यार्थ्यांना कितपत समजतात याचा शोध घेणे हा या मागचा उद्देश आहे.आगामी शैक्षणिक सत्रात (2024-25) हे बदल लागू होणार आहे.
याबाबत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मल्टीपल चॉइस प्रश्न (एमसीक्यू), केस-आधारित प्रश्न, स्त्रोत-आधारित एकात्मिक प्रश्न किंवा संकल्पना अनुप्रयोग प्रश्नांची टक्केवारी 40 वरून 50 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. तर लहान आणि दीर्घ उत्तरांसह इतर प्रश्नांची टक्केवारी ही 40 वरून 30 टक्क्यांवर आणली आहे. हे पाऊल विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीत बदल घडवून आणेल, तसेच पाठांतर करण्या ऐवजी त्यांना विविध संकल्पना अधिकाधिक समजून घेण्याच्या दिशेने हे नवे बदल मदत करणार आहेत.
याबाबत माहिती देताना सीबीएसईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 नुसार, मंडळाने शाळांमध्ये कार्यक्षमतेवर आधारित शिक्षण पद्धतीच्या अंमलबजावणीच्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत, ज्यामध्ये कार्यक्षमतेवर आधारित मूल्यांकन आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी काही विशेष शैक्षणिक साहित्य तयार करण्यात येणार आहे. सीबीएसई प्रामुख्याने अशी शैक्षणिक प्रणाली तयार करण्यावर भर देत आहे ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सर्जनशील विचारांचा विकास करणे हा आहे.
पाठांतराऐवजी शिकण्यावर ही नवी शिक्षण प्रणाली भर देते, जेणेकरून विद्यार्थी नव्या आव्हानांना विद्यार्थी खऱ्या अर्थाने सामोरे जाऊ शकतील. इयत्ता नववी आणि दहावीच्या परीक्षेच्या स्वरूपामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच 10 वीच्या विद्यार्थ्यांना यापुढे 2 ऐवजी 3 भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. यात 2 स्थानिक आणि एका परकीय भाषेचा समावेश असेल. तसेच दहावीच्या अभ्यासक्रमात 7 विषय जोडण्याचा प्रस्ताव देखील देण्यात आला आहे. यामध्ये सामाजिक विज्ञान, विज्ञान, गणित आणि कंप्यूटेशन थिंकिंग, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण यांचा समावेश करण्यात आला आहे. तीन भाषा, गणित आणि संगणकीय विचारसरणी, सामाजिक विज्ञान, विज्ञान आणि पर्यावरण या विषयांचे बाह्य मूल्यमापन केले जाणार आहे. तर 3 विषयांचे मुल्यांकन अंतर्गत आणि बाह्य दोन्ही पद्धतीने केले जाणार आहे. या सर्व 10 विषयांत उत्तीर्ण होणे क्रमप्राप्त ठरणार आहे.