| सांगली समाचार वृत्त |
अकोला - दि.१५ एप्रिल २०२४
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने राज्यात स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आज वंचित आघाडीने २०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
काय आहे वंचितच्या जाहीरनाम्यात ?
एनआरसी, सीएए कायदा असंवैधानिक. या कायद्यांमुळे हिंदूतील भटक्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. या लोकांच्या अधिवासाची कोणतीच नोंद नसल्याने त्यांचं नागरिकत्व धोक्यात येईल, असे म्हणत याला विरोध करण्याची भूमिका वंचितने आघाडीने घेतली आहे.
तसेच शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा केला जाईल. त्याचे उल्लंघन करणाऱ्याला आर्थिक दंड आणि गुन्हा दाखल करू. शिक्षणाच्या धोरणाला कथित शिक्षण महर्षींच्या कैदेतून मुक्त करू.शिक्षणासाठीची तरतूद 3 टक्यांवरून 9 टक्क्यांपर्यंत वाढवू. सार्वजनिक क्षेत्रात खाजगी गुंतवणूक आणि विक्रीला थांबवू. शेतीवर आधारीत उद्योगांना चालना देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
त्याचबरोबर कापूस, सोयाबीनला बाजारभाव मिळत नाही. सत्तेत आलो तर कापसाला किमान 9 हजार तर सोयाबीनला 5 ते 6 हजार भाव देऊ. शेतीला उद्योगाचा दर्जा कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासनही या जाहीरनाम्यामधून देण्यात आले आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.