Sangli Samachar

The Janshakti News

सायबर फ्रॉडचा नवा जुगाड; महिला विचारेल प्रश्न; एक बटण दाबताच लागेल चुना



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.१७ एप्रिल २०२४
आजचं युग सायबर युग आहे. त्यामुळे अनेक गोष्टी सुलभ झाल्या आहेत; मात्र योग्य सावधगिरी न बाळगल्यास सायबर फसवणुकीला बळी पडण्याच्या घटनाही अगदी सहज घडताना दिसत आहेत. त्यासाठी गुन्हेगार दररोज वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून काढत असतात. सध्या अशीच एक नवी क्लृप्ती फसवणुकीसाठी वापरली जात आहे. ती वेळीच लक्षात आली नाही, तर अगदी क्षणात बँक खातं रिकामं होऊ शकतं. दिल्लीत अशा अनेक घटना घडल्या असून, त्याच्या तक्रारी सायबर सेलकडे दाखल झाल्या आहेत.

ऑनलाइन पेमेंट, क्रेडिट-डेबिट कार्डने पेमेंट, तसंच ऑलाइन सुविधेचा लाभ घेतल्यानंतर कंपनी आणि बँकांकडून ग्राहकांना फोन करून फीडबॅक विचारतात. अनेक बँकांनी सायबर सिक्युरिटीच्या कारणामुळे कोणतंही पेमेंट करण्याआधी रजिस्टर्ड फोनवर फोन करून ग्राहकाकडून फीडबॅक घेणं अनिवार्य केलं आहे. कोणी अन्य व्यक्ती ग्राहकाला फसवू नये असा उद्देश त्यामागे असतो; मात्र यात आता काही गुन्हेगार आपली पोळी भाजून घेत आहेत.

दिल्ली पोलिसांशी निगडित असलेले सायबर एक्सपर्ट किसलय चौधरी यांनी सांगितलं, की सध्या सायबर फसवणुकीचा एक नवा प्रकार सुरू झाला आहे. त्यामध्ये एखाद्या सर्वसामान्य नंबरवरून कॉल येतो आणि तिकडून एका मुलीचा आवाज येतो. ती विचारते, की 'तुम्ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे का? घेतली असेल तर एक दाबा आणि घेतली नसेल तर दोन दाबा.' बहुतांश जणांनी लस घेतलेली असल्याने अनेक जण तातडीने एक दाबतात आणि खेळ तिथूनच सुरू होतो.


किसलय यांनी सांगितलं, की एक किंवा दोन यांपैकी कोणतंही बटण दाबलं, तरी फोन हँग होतो. काय घडतंय हे त्या व्यक्तीच्या लक्षात येण्याच्या आत त्या व्यक्तीच्या फोनचं नियंत्रण सायबर गुन्हेगारांकडे गेलेलं असतं आणि खात्यातून पैसे उडतात.

कोरोना लसीकरणाच्या नावावर फसवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या आहेत. पोलीस या संदर्भात नागरिकांना सावध करत आहेत. तसंच विनाकारण कोणत्याही कॉलला उत्तरं देऊ नयेत, असं आवाहनही केलं जात आहे.

किसलय असं सांगतात, की सायबर क्रिमिनल इतके हुशार असतात, की एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला कसं फसवायचं हे त्यांना चांगलंच माहिती असतं. ते असे प्रकार घेऊन येत आहेत, की प्रथमदर्शनी कोणाला ती फसवणूक असू शकेल असा अंदाजच येत नाही. त्यामुळे कायमच सावध राहिलं पाहिजे. जंक कॉल घेऊ नये. चुकून असा कॉल घेतला गेला, तरी त्याला रिस्पॉन्स देऊ नये.