Sangli Samachar

The Janshakti News

पवार गटाकडून आदेशाचे पालन नाही! सुप्रीम कोर्टात याचिका



सांगली समाचार - दि ४ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हाचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरताना हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख करण्याचे आदेश दिले होते, पण या आदेशाचे पालन होत नसल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला असून, तशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. 

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू संघवी यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांनी न्यायालयात (Supreme Court) सांगितले की, सुप्रीम कोर्टाने 19 मार्चला याबाबत आदेश दिले आहेत. त्याचे पालन होत नाही. त्यांनी याबाबत अर्ज दाखल करून सूट देण्याची मागणी केली आहे. पण आता आपण लोकसभा निवडणुकीच्या  मध्यात आहोत, हे बदलता येणार नाही.

कोणत्याही वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आलेली नाही, असा दावा सिंघवी यांनी केला. तसेच आजच्या सुनावणीदरम्यान कोर्टाकडून अजित पवार  गटाच्या वकिलांना किती जाहिराती दिल्या, याबाबत विचारणा केली. तसेच आमच्या आदेशाचे पालन करायला हवे, असेही सांगितले.


काय आहे प्रकरण ?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरू देऊ नये, अशी मागणी केली होती. ही मागणी मागील महिन्यात कोर्टाने फेटाळली. पण त्यासाठी काही अटी घातल्या आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने चिन्हाचा वापर अटी - शर्थींसह करण्यात यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

अजित पवार गटाने यापुढे घड्याळ चिन्ह वापरताना प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी, 'घड्याळ चिन्हाबाबतचे निकालाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे', असे 'ठळक' अक्षरात उल्लेख करावा लागणार आहे. याबाबत जाहिराती देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते.