| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२२ एप्रिल २०२४
नेता त्याच्या नावानं कितीही मोठा असला तरी तो मैदानातली सभा गाजवणारा फर्डा वक्ता असला पाहिजे आणि आजच्या काळात असा उत्तम वक्ता असलेला नेता म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे!
'सिंह जिथं गर्जना करतो तिथंच त्याचा दरबार भरतो !'
'वक्तादशसहस्त्रेषु' हे बिरूद ज्यांच्या नावापुढं कायम लागलं असा नेता म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray. बच्चनच्या एका सिनेमातला एक डायलॉग आहे,' हम जहाँ खडे होते है लाइन वही सें शुरू होती है |' बाळासाहेबांच्या वक्तृत्वाबाबतही 'सिंह जिथं गर्जना करतो तिथंच त्याचा दरबार भरतो,' असंच काहीसं म्हणावं लागेल.
बाळासाहेब बोलायला उभे राहिले की, त्यांच्या भाषणातून नाद, गर्जना, जोश, आवेश, जल्लोष, उपरोध अशी बहुगुणी वाणी बरसायची. बाळासाहेब आणि मैदान हे नातं त्या मैदानात बसून त्यांना ऐकलेला श्रोता कसा विसरू शकेल? मात्र आजच्या काळात मैदान गाजवणारे नेते शोधायचे म्हटले तरी ते शोधून देखील सापडणार नाहीत. याच बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले त्यांचे पुतणे अर्थात Raj Thackeray राज ठाकरे! डिट्टो बाळासाहेबांची कार्बन कॉपी जणू! त्यांच्या सारखाच 'ठाकरी' शैलीतला पहाडी आवाज, त्यांच्या सारखाच बोलण्याचा ढब, लहेजा आणि हावभाव देखील सेम टू सेम!
राज ठाकरेंच्या वक्तृत्वाची अन्य पक्षाच्या उमेदवारांना भुरळ !
आता कुठं लोकसभेची निवडणूक ऐन मोसमात आलीये. प्रचार सभांचा धुरळा उडू लागलाय. नेत्यांच्या भाषणांना धार येऊ लागलीये आणि अशातच महायुतीच्या उमेदवारांकडून राज ठाकरेंच्या सभांना मागणी येऊ लागलीये. छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाच्या संदीपान भुमरेंना Sandipan bhumre काय जाहीर झाली त्यांनी थेट जाहीरच बोलून टाकलं,'माझ्या प्रचारासाठी राजसाहेबांच्या सभेचं नियोजन करा, निवडून आल्यानंतर पहिल्यांदा त्यांचं दर्शन घ्यायला जाईन.'
विद्यमान आमदार, राज्य मंत्रिमंडळात मंत्री तरीसुद्धा एका पक्षाच्या उमेदवाराला दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या भाषणाची गरज भासावी? यावरूनच राज ठाकरेंच्या वक्तृत्वाची क्रेझ दिसून येते. आजही विविध पक्षांचे दिग्गज नेते राज ठाकरेंचं भाषण कान लावून ऐकतात. केवळ मनसैनिकच नव्हे तर सर्वसामान्य जनता देखील राज ठाकरेंना ऐकायला-पाहायला टीव्हीसमोर बसते. राज ठाकरेंची सभा लावल्यास आपण विजयी होऊ याची खात्री आता इतर पक्षातील नेतेमंडळीही देऊ लागली आहेत.
एकूणच काय तर आगामी काळात महायुतीच्या उमेदवारांमध्ये राज ठाकरेंच्या सभेसाठी चढाओढ लागली तर नवल वाटून घेऊ नये. 'तेवढी राज ठाकरेंची सभा लावा की राव?...'