yuva MAharashtra सांगलीच्या उमेदवारीसाठी विशाल पाटलांचे समर्थक आक्रमक, थेट रक्ताने लिहलेले पत्र

सांगलीच्या उमेदवारीसाठी विशाल पाटलांचे समर्थक आक्रमक, थेट रक्ताने लिहलेले पत्र



सांगली समाचार - दि. १३ एप्रिल २०२४
जत - मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून रस्सीखेच सुरु होती. अशात महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेली असून, पै. चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अजूनही काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली जात आहे. आता तर विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी चक्क त्यांच्या कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहले आहे. तसेच विशाल पाटलांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर हे रक्ताची पत्र झळकावण्यात आले आहे. 

विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी रक्तांने पत्र लिहले आहे. रक्ताने पत्र लिहत विशाल पाटलांना लोकसभा निवडणूक लढवण्याची जत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. सांगलीत विशाल पाटलांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर रक्ताची पत्र झळकावत विशाल पाटलांना निवडणूक लढवण्याची मागणी करण्यात आली आहे. धनगर समाजाच्या आरक्षण मागणी बाबत भाजपकडून खोटे आश्वासन दिल्याचा आरोप करत, आरक्षण मिळवून देण्यासाठी विशाल पाटलांनी निवडणूक लढवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. रक्ताने लिहिलेले पत्र विशाल पाटलांच्याकडे सुपूर्द करत धनगर बांधवांचा पाठिंबा असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. 

विशाल पाटलांची भूमिका काय ?

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी विशाल पाटील सुरवातीपासूनच इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी विश्वजित कदम देखील प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे कदम आणि पाटील यांनी सांगलीच्या जागेसाठी थेट दिल्ली गाठत सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी वरिष्ठांकडे भूमिका मांडली. हे सर्व सुरु असतानाच ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करून टाकली. त्यामुळे तिढा आणखीनच वाढला. मात्र, शेवटी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अंतिम निर्णय घेत ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली. मात्र, विशाल पाटील यांनी अजूनही माघार घेतल्याचे स्पष्टपणे सांगितले नाही. अशात त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. तसेच, ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे विशाल पाटील यांची भूमिका नेमकी काय हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

तर चंद्रहार पाटलांची अडचण वाढणार ? 

महाविकास आघाडीकडून सांगलीमधून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, विशाल पाटील यांनी अजूनही चंद्रहार पाटील यांना पाठींबा दिलेला नाही. तसेच विशाल पाटील यांच्याकडून वेगळी भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास आणि विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांच्या विरोधात रिंगणात उतरण्याचा निर्णय घेल्यास याचा फटका महाविकास आघाडीला म्हणजेच पै. चंद्रहार पाटील यांना बसण्याची शक्यता आहे.