सांगली समाचार - दि. ९ एप्रिल २०२४
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. सकाळी महाविकास आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. त्यानंतर काँग्रेसच्या सांगलीतील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी पसरल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे नेते, सांगलीतून उमेदवारीसाठी इच्छूक असणारे विशाल पाटील सकाळपासून नॉटरिचेबल आहेत. काँग्रेसच्या जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोरही सध्या शुकशुकाट आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
विशाल पाटील यांना उमेदवारी न दिली गेल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. विशाल पाटील यांना उमेदवारी दिली गेली नाही. याचा आम्ही निषेध करतो. सांगली जिल्हा हा काँग्रेसचा आहे. ज्यांनी कटकारस्थान केलं, त्यांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करणार आहोत, असं पत्रकांरांशी बोलताना स्थानिक कार्यकर्ते म्हणत आहेत. सगळ्यांना पुरून उरणार, असं पोस्टर विशाल पाटील समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व आहे. मात्र महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेकडे गेली. शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. विश्वजीत कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली, विशाल पाटील यांच्यासोबतच इतर काँग्रेस नेत्यांसोबत विश्वजीत कदम दिल्लीला गेले. तिथे त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली.
विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी दोनदा दिल्लीवारी करूनही फारसा काही बदल झाला नाही. आज अखेर महाविकास आघाडीच्या बैठकीत चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं. थोड्या वेळा आधी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. यात ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत यांनी चंद्रहार पाटील हेच सांगलीतून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असं पुन्हा एकदा सांगितलं अन् सांगलीची जागा काँग्रेसच्या हातून निसटली. यानंतर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यामध्ये नाराजी पसरली.