yuva MAharashtra म. जोतिबा फुले यांनी नाहीरे वर्गाला समता व स्वाभिमान दिला - प्रा. एन.डी.बिरनाळे

म. जोतिबा फुले यांनी नाहीरे वर्गाला समता व स्वाभिमान दिला - प्रा. एन.डी.बिरनाळे



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१४ एप्रिल २०२४ -
भारतातील नाहीरे वर्गाचे शोषण थांबण्यासाठी बहुजन समाजातील मुला-मुलींना शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून महात्मा जोतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. मंदीरातील दिव्यापेक्षा ज्ञानाचा दिवा महत्वाचा आहे. यासाठी सत्यशोधकी समाजप्रवृत्ती मजबूत करण्यासाठी त्यांनी सनातन्यांचा विरोध स्वीकारून शिक्षण कार्य चालू ठेवले. वंचितांना शिक्षणाची दारं खुली होऊन समता व समृद्धी गरीबाघरी आली. छ. शिवाजी महाराजांची समाधी झाडाझुडपात झाकाळून गेली होती. ती फुल्यांना शोधून काढली आणि त्यावर फुले अर्पण करून पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली होती. शिवबांवर त्यांनी पहिला पोवाडा रचला होता. महात्मा जोतिबा फुले,क्रांतीमाता सावित्रीमाई, छ. शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास शाळा काॅलेज मधील विद्यार्थ्यांनी केला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक विभागाचे कार्यकारी अध्यक्ष व पृथ्वीराज पाटील बाबा यांच्या यशोधन सेवा व संपर्क कार्यालयाचे मानद जनसंपर्क अधिकारी प्रा. एन.डी.बिरनाळे व यांनी केले. ते सांगलीत कर्मवीर चौकातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समिती आयोजित म. जोतिबा फुले यांच्या १९७ व्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. 

प्रारंभी म. फुले आणि अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांना प्रा. बिरनाळे आणि माजी नगरसेविका सौ. शेवंताताई वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गॅब्रीयल तिवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सुजाता पवार यांनी मा. फुले यांचे कार्य सांगितले. आभार शेवंताताई वाघमारे यांनी मानले. 

यावेळी शेवंताताई वाघमारे, गॅब्रिएल भाऊ तिवडे, जितेंद्र हेगडे, सुजाता पवार, राजू चव्हाण, संजय मोरे, अर्जुन मजले, दादासो कस्तुरे, तम्मा दोडमणी, सतीश मोहिते, बबन साठे, आदी उपस्थित होते.