yuva MAharashtra सांगलीत विरोधकांचे ठरेना, भाजपमध्ये जमेना

सांगलीत विरोधकांचे ठरेना, भाजपमध्ये जमेना



सांगली समाचार - दि. २ एप्रिल २०२४
सांगली - सांगली लोकसभा मतदार संघातील वाद शमताना दिसत नाही. महाविकास आघाडीत उमेदवारीवरून वाद सुरू असताना शिवसेनेने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसनं नाराजी दर्शवित मैत्रीपूर्ण लढतीचा इशारा दिला. मतांचा गठ्ठा विरोधात जाण्याची शक्यता असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. दुसरीकडे भाजपकडून दुसर्‍या यादीतच संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, पक्षांतर्गत सुरू असलेला वाद अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे सांगली मतदारसंघात विरोधकांचे ठरेना, भाजपमध्ये जमेना, अशी अवस्था असल्याचे चित्र दिसते.

लोकसभा निवडणूक 16 मार्चला जाहीर झाली. त्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सांगली लोकसभेच्या  जागेवरून गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेना व काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षप्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली. या वेळी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील नेत्यांनी प्रदेश व केंद्रीय पातळीवरील नेत्यांची भेट घेऊन काँग्रेसला उमेदवारी देण्याची मागणी केली. शिवाय कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नसल्याचा इशारा दिला होता.

महाविकास आघाडीच्या बैठकीतही सांगलीचा विषय चांगलाच गाजला. मात्र, तोडगा निघाला नाही, त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या यादीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली. याविरोधात काँग्रेस नेत्यांनी आक्रमक होत दिल्ली गाठली. तेथेही तोडगा निघालेला नाही, त्यामुळे काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रह धरला आहे. जिल्ह्यात शिवेसेनेची ताकद नसताना लोकसभेची उमेदवारी घेत काँग्रेसला डिवचले आहे. ना आमदार, ना जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य नाही. कोणतीही ग्रामपंचायत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पदाधिकारी आणि सदस्य नसतानाही जागा खेचली आहे. पण, काँग्रेसचा आक्रमकपणा कायम असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे.

काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत केलीच तर सेनेला म्हणावे तितके सोपे नाही. प्रचार यंत्रणा राबविणेही अवघड होणार आहे. मात्र, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीची साथ मिळू शकते. या पार्श्वभूमीवर युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील हे जिल्ह्यातील सेनेच्या नेत्यांशी सातत्याने संपर्क साधत आहेत. महाविकास आघाडीत काय चर्चा सुरू आहे, याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. संयमाने वागा. प्रचाराचा वेग वाढवा. काही दिवसांत महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आपल्यासोबत उभे असतील. काँग्रेसमधील नाराजी दोन दिवसांत संपेल, असे सांगण्यात येत आहे. परंतु, जिल्ह्यात पकड नसताना शिवसेनेचा खासदार करण्याचे स्वप्नच राहणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

विरोधकांमध्ये गैरमेळ असताना भाजपमध्येही सर्वकाही ठिकठाक नाही. भाजप नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष आहे. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांनी उमेदवारी मागितली होती, याशिवाय खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी भाजपमधील काही नेते व पदाधिकार्‍यांची होती. पण, पक्षाकडून पुन्हा संजयकाका पाटील यांना तिसर्‍यांदा उमेदवारी देत भाजपने धक्का दिला. पक्षांतर्गत विरोध डावलून दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे. कोण काय म्हणतंय याकडे दुर्लक्ष करीत खासदार पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अद्याप महायुतीतील घटक पक्षही खासदारांच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे भाजपमध्ये मानापमान नाट्य कायम असून, पक्षांतील नेत्यांमध्ये सूर जमलेला नसल्याचे दिसून येते.