| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.१५ एप्रिल २०२४
वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे. कृषीसह सर्वच घटकांच्या विजेसाठी सहा ते आठ टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. कृषी पंपाच्या वीजदरात १२ टक्के वाढ केल्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणने जोरदार 'शॉक' दिला आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने द्विवार्षिक वीज दरवाढीला मंजुरी दिली होती. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील वाढ नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजे एप्रिल महिन्यापासून लागू झाली आहे. या वीजदरवाढीमुळे वीजदरात ६ ते १२ टक्के वाढ होणार असून, स्थिर आकाराचा अतिरिक्त बोजाही ग्राहकांवर पडणार आहे. हा आकार सर्व प्रकारच्या दरवाढीवर कमाल १० टक्क्यांपर्यंत आहे. आयोगाने मागील वर्षी 'महावितरण'च्या वीजदरवाढीला मंजुरी दिली होती.
ही दरवाढ आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांकरिता आहे. त्यामुळे मागील वर्षी १ एप्रिल २०२३ या आर्थिक वर्षात जवळपास तीन टक्के वीजदरवाढ करण्यात आली. आता २०२४ या आर्थिक वर्षापासून ही दरवाढ सहा टक्के लागू करण्यात आली. आधीच महागाई कमी होण्याचे नाव घेत नसताना दुसरीकडे महावितरणकडून झालेली दरवाढ कंबरडे मोडणारीच आहे.
असे आहेत कृषी पंपांसाठीचे दर
लघुदाब शेती पंपासाठी २०२२-२३ला ३.३० रुपये प्रतियुनिट दर होता. २०२४-२५ ला हा दर ४.५६ रुपये प्रतियुनिट झाला आहे. उच्चदाब शेती पंपासाठी ४.२४ रुपये प्रतियुनिट दर होता. २०२४-२५ साठी तो ६.३८ रुपये झाला आहे.
कृषी वीज ग्राहकांना वीज दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. १ एप्रिलपासून वीज बिलात वाढ होणार असून, ही दरवाढ काही दिवसांकरिता असून, नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे. नागरिकांनी आपल्या विजेच्या बिलाचा भरणा वेळीच करावा, अन्यथा थकीत वीज बिल असणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल. - धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता, महावितरण
दरम्यान या वीज दरवाढीचा झटका
महायुतीला बसू शकतो. या वीज दरवाढी विरोधात वातावरण तयार करण्यात येत असून महाआघाडी याचा निश्चित फायदा घेणार हे नक्की.