yuva MAharashtra मावळ तालुक्यातील औंढे खुर्द गावात आढळली मराठाकालीन बारव आणि शिलालेख

मावळ तालुक्यातील औंढे खुर्द गावात आढळली मराठाकालीन बारव आणि शिलालेख



सांगली समाचार - दि. १३ एप्रिल २०२४
पुणे -  मावळात उत्तर मराठा कालखंडातील अनेक शिलालेख उपलब्ध होत आहेत. हा प्रदेश त्या काळात पेशव्यांच्या थेट अंमलाखाली होता. त्यामुळे पेशव्यांशी संबंधित लोकांचा वावरही येथे मोठ्याप्रमाणात होता. धामधुमीच्या काळात पुणे परीसरातील लोकसंख्या लोहगड-विसापूर तसेच मावळातील इतर अनेक किल्ल्यांच्या आश्रयास आल्याचे उल्लेख या कालखंडातील ऐतिहासिक साधनांमधून विखूरलेले आढळून येतात. पेशव्यांकडूनही अनेक कारणांमुळे इनाम मिळालेल्या जमिनींवर हे लोक येऊन स्थायिक होत होते. मावळातील अनेक गावांमध्ये ब्राह्मणांच्या स्वतंत्र वसाहती म्हणजेच लहान वाड्याही दिसून येतात, जेथे सध्या ब्राह्मण कुटूंबांच्या ऐवजी कुळाची वस्ती आहे. या ब्राह्मण वसाहतींचे संदर्भच मूळी अठराव्या शतकातील आढळून येतात. हे संदर्भ म्हणजे काय तर कागदपत्रांतील त्यांचे उल्लेख तसेच या वाड्यामध्ये त्यांच्याकडून बांधकाम करण्यात आलेल्या वास्तू, मंदिरे आणि पाणवठे.


नाणे मावळातील औंढे खुर्द हे तसे ऐतिहासिक गाव. गावात नागनाथ महादेवाचे जूने ऐतिहासिक देऊळ आहे. देवळासमोर मंदिराचेच प्राचीन अवशेष, वीरगळ, स्मृतिशिळा आहेत. एका शिळेवर तर येथील स्थानिक वतनदार असलेल्या 'मोवाजी पाटील भोसले मोकदम' यांचा नामोल्लेख करणारा शिलालेखही आहे. त्याशेजारीच शिव-पार्वतीची 'रावणानुग्रह' मूर्ती आहे. देवळापासून जवळच गोवत्स शिळा आहे. हे शिल्प गुरांना चरण्यासाठी दान दिलेल्या गवताळ जमिनीवर सामान्यतः आढळून येते. नागनाथ मंदिराच्या मागील तलावापासून थोड्या अंतरावर वाघोबाचे स्थान आहे. वाघोबाचे शिल्प या भागात महत्वाच्या खिंडींमध्ये किंवा जवळच्या गावात आढळून येतात. गावाच्या दक्षिणेस 'धामणदऱ्या'च्या पायथ्याला एक कातळात कोरलेली पाणपोढी आहे. पोढी म्हणजे पाणी साठवण्यासाठी तयार केलेली टाकी. अशा पोढी लेण्यांमध्ये तसेच व्यापारी मार्गांवरही मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

'धामणदरा' हे औंढे गावाला आपटी या गावाशी व‌ पर्यायाने नाणे मावळास पौन मावळाशी जोडणाऱ्या एका खिंडीचे नाव. कोकणातून कुरवंडे किंवा बोरघाटमार्गे लोणावळ्यात येणारा मार्ग पुढे विभागला जात असे. एक मार्ग आजच्या जुन्या पुणे-मुंब‌ई महामार्गावरुन चाकण किंवा पुण्यास जात असे. तर दुसरा मार्ग कुसगाव बुद्रुक – डोंगरगाववाडी – औंढे मार्गे धामणदऱ्यातून पुढे आपटी – आंबेगाव – डोणे – कासारसाई – मारुंजीमार्गे पुण्याकडे जात असे.

वर उल्लेख केलेल्या डोंगरगावच्या वाडीतही एक ऐतिहासिक बारव आहे. ही चौरसाकृती बारवेचा निर्माता रामाजी महादेव बिवलकर असून त्यावर शके १६८८ चैत्र शुद्ध प्रतिपदा (म्हणजेच १० एप्रिल १७६६) असा दिनांक आहे. कल्याण-साष्टी प्रांताचा तसेच उत्तर कोकणचा सरसुभेदार म्हणून हा व्यक्ती मराठा इतिहासात तसा बराच प्रसिद्ध आहे. या बारव व शिलालेखांची पूर्वी नोंद झालेली आहे.

डोंगरगावातून धामणदऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर याच औंढे खुर्द गावाच्या हद्दीत एक मराठाकालीन बारव म्हणजे पायऱ्यांची विहीर आहे. बारवेचा आकार चौरसाकृती असून त्यात उतरण्यासाठी दक्षिणेकडून पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या उजव्या भिंतीवर बारवेच्या निर्मितीचा 4 ओळींचा उठावदार शिलालेख असून बारव व शिलालेखाची नोंद यापूर्वी कुठेही झालेली नाही. शिलालेखातील मजकूर पुढीलप्रमाणे:
दुल्लभसेट गोविदजि शके १७१२ साधारण नाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा प्रारंभ ॥

शिलालेखात नमूद 'दुल्लभशेट गोविंदजी' हे या बारवेच्या निर्मात्याचे नाव. शके १७१२ चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर (मंगळवार, १६ मार्च १७९० रोजी) या बारवेच्या बांधकामास सुरुवात झाली. असा या लेखातून सर्वसाधारण अर्थ निघतो. पेशवे दप्तरांत अप्रकाशित स्वरुपात उपलब्ध असलेल्या इ.स. १७८२-८३ च्या दोन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये या व्यक्तीचा उल्लेख 'दुल्लभशेट गोविंदजी गोसावी' असा आला आहे. कोकणातील गाडद्यांसाठी बंदुकीच्या दारुची मागणी करणारे व कल्याण प्रांतातील कोळी व इंग्रजांचा बिमोड करण्याविषयीची ही दोन पत्रे दुल्लभशेट यांस उद्देशून लिहण्यात आलेली आहेत. अर्थात दुल्लभशेट हा मराठेशाहीच्या उत्तरार्धातील इतिहासातील एक महत्त्वाचे असे व्यक्तिमत्त्व होते.

ही बारव एका शेतात असल्यामुळे येथील शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यास तिचा उपयोग होत असणार यात काही शंका नाही. पण मार्गालगतही असल्यामुळे धामणदऱ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना या पाणवठ्याचा काही उपयोग होत असावा का ? किंवा या जमिनीचा आणि दुल्लभशेटचा थेट संबंध कसा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मावळच्या इतिहासाच्या एक-एक पानांसह हळूहळू पुढे उलगडली जातील.