| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.१६ एप्रिल २०२४
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा महत्वाचा आणि सगळ्यांत मोठा असेल हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सी वोटरने जे सर्वेक्षण केले त्यानुसार मतदारांचा मूड काय आहे ते लक्षात येणारी आकडेवारी समोर आली आहे. या जनमत चाचणीनुसार देशातील ३२ टक्के मतदारांना बेरोजगारी हा निवडणुकीतील सगळ्यांत प्रमुख मुद्दा वाटतो आहे. २३ टक्के मतदारांच्या मते महागाई हा मुख्य मुद्दा आहे. ९ टक्के लोकांनी विकासाचा मुद्दा महत्वाचा असल्याचे म्हटले आहे तर केवळ पाच टक्के लोकांना भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रमुख वाटतो. २ टक्के लोकांनी कायदा आणि सुव्यवस्था हा त्यांच्यादृष्टीने महत्वाचा विषय असल्याचे किंवा निवडणुकीत महत्वाचा विषय ठरणार असल्याचे म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्या संकल्पपत्रात रोजगार या विषयावर फोकस केला आहे. भाजपच्या संकल्प पत्रात कौशल्य विकास योजना व्यतिरिक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मध्यम वर्गातील कुटुंबांसाठी चांगले शिक्षण, घर, आरोग्य सुविधा आणि रोजगारासोबतच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.
कॉंग्रेसने आपल्या घोषणा पत्रात जातनिहाय जनगणनेसोबतच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा संपुष्टात आणण्याची गॅरंटी दिली आहे. एमएसपीला कायदेशीर दर्जा, जीएसटी आणि कर्जमुक्त शेती आणि कर्ज आयोग बनवण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले आहे. त्याचसोबत कामगार न्याय अंतर्गत कामगारांना आरोग्य, किमान ४०० रूपये मजुरी आणि शहरी रोजगार हमीचा वादा कॉंग्रेसने केला आहे.
लोकसभा निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे –
मुद्दा आणि टक्केवारी
बेरोजगारी -३२
महागाई – २३
विकास – ९
भ्रष्टाचार – ५
कायदा व्यवस्था – २
अन्य – २९