सांगली समाचार- दि. ९ एप्रिल २०२४
पूजेच्या वेळी किंवा कोणत्याही सणाला औक्षण केल्यानंतर कपाळावर टिळा लावतो. कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी कपाळावर टिळा लावण्याची परंपरा आहे. टिळा लावणं मंगलतेचं प्रतीक मानलं जाते. कपाळावर टिळा लावण्यासाठी कुंकू, अष्टगंध, चंदन, हळद किंवा अंगारा यांचा सहसा वापर होतो. नाम ओढणे किंवा टिळा लावल्यानंतर त्यावर अक्षत म्हणजेच तांदूळही लावले जातात. टिळा लावून त्यावर अक्षत लावल्यानं तो टिळा पूर्ण मानला जातो.
टिकली, टिळा, नाम नेहमी कपाळाच्या मध्यभागी लावला जातो. असं मानलं जातं की, कपाळावरील टिळा शरीरातील सर्व सात ऊर्जा केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. कपाळाच्या मध्यभागी गुरू ग्रह देखील स्थित आहे, त्यामुळे कपाळावर टिळा लावून बृहस्पति बलवान होऊ शकतो. यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा जलद प्रवाहित होते आणि मन आणि मेंदू निरोगी राहतात.
टिळा-नामावर अक्षता का लावतात ?
नाम ओढून त्यावर अक्षता लावल्यानं अध्यात्म भावना विकसित होण्यास मदत होते. जीवनातील सर्व ग्रहांचे संतुलन राखण्यास मदत होते. प्रत्येक ग्रह विशिष्ट गुण, शक्ती आणि देवतांशी संबंधित आहे. टिळ्यावर अक्षता वापरल्यानं ग्रहांच्या हालचालीमुळे होणारे दैवी प्रभाव वाढतात. मुख्यतः अक्षता (तांदूळ) सूर्याची ऊर्जा एकाग्र करण्यास आणि संपूर्ण शरीरात पसरण्यास मदत करतो.
टिळ्यावरील अक्षता कोणत्याही व्यक्तीच्या उपजीविकेचे आणि विपुलतेचे प्रतीक मानल्या जातात. त्या सौर उर्जेचे वाहक बनतात. जो कोणी असा टिळा-नाम लावतो, त्याच्या जीवनात शक्ती, धैर्य आणि दैवी आशीर्वाद मिळतात, असे मानले जाते. कपाळावर अक्षता चिकटवल्यानं व्यक्तीचे आयुष्य समृद्ध होण्यास मदत मिळते. जीवनात कधीही धन आणि धान्याची कमतरता येत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षत म्हणजे ज्याचा कधीही नाश होऊ शकत नाही. आर्थिक सुबत्तेशीही याचा संबंध जोडला जातो. कपाळावर नाम, टिळा लावून अक्षता लावल्यास शुभफळ प्राप्त होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.