सांगली समाचार दि. ११ एप्रिल २०२४
इस्लामपूर - हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपुरामध्ये कार्यकर्त्यांना चांगला दम भरला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सर्वांनी घासून पुसून काम करायचं असल्याचं जयंत पाटील यांनी सांगत कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला. इस्लामपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये जयंत पाटील यांनी लोकसभेची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम असल्याचे सांगत बूथ नियोजन करण्याचे आवाहन केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत असल्याने कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हातकणंगले लोकसभेला महाविकास आघाडीकडून शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीकडून धैर्यशील माने रिंगणात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघांमध्ये तगडं आव्हान निर्माण केलं आहे. मात्र, राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीने पाठिंबा न देता उमेदवार दिल्याने चुरशीची लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे डी.सी. पाटील सुद्धा रिंगणात असल्याने चौरंगी लढत होत आहे.
सर्वांनी घासून-पुसून काम करायचं आहे
जयंत पाटील सभेत बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी उमेदवाराचे सर्वांनी घासून-पुसून काम करायचं आहे. कोणाच्या घरी, कोणी चहा पिऊन गेले, मला चालणार नाही. आले, घरात बसले, आम्ही काय करू, असला धंदा बंद करा असा सज्जड दमही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. अचानक कोणी घरी आले तर, तुम्ही घरी जाऊ नका, बाहेर जावा असे सांगत सध्या इलेक्शन सुरू आहे. त्यामुळे तुमचे कोण, काय संबंध असतील, ते इलेक्शन नंतर असेही जयंत पाटील म्हणाले.