सांगली समाचार - दि ६ एप्रिल २०२४
सांगली - लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीत धूसफूस अद्याप संपलेली नाही. दिवसेंदिवस हा वाद वाढतानाच दिसत आहे. आता ठाकरे गटाने कार्टूनच्या माध्यमातून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. त्यानंतर काँग्रेसकडून कार्टूनच्या माध्यमातून चाचपणी दौरा असं म्हणत टीका केली गेली. काँग्रेसने केलेल्या टीकेला शिवसेना ठाकरे गटानेही कार्टूनमधून टोला लगावला आहे. शिवसेनेकडून सांगली कॉंग्रेसचा फुगा फुटला असे म्हणत कॉंग्रेसला प्रत्युत्तर देण्यात आलेय. यासाठी जुनाच मुद्दा 'कार्टून'साठी घेण्यात आला असून २०१४ मध्ये केंद्रीय मंत्री असताना ३.५ लाख मतांनी पराभव आणि २०१९ मध्ये १.५ लाख मतांनी पराभव असे या कार्टून मध्ये शिवसेनेकडून उल्लेख करत कॉंग्रेसच्या झालेल्या पराभवाची आठवण करून देण्यात आलीय. कार्टून वॉरमुळे आता सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील धूसफूस कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता आहे.
दरम्यान, सांगली लोकसभेचा महाविकास आघाडीतला तिढा वाढण्याची शक्यता दाट झाली आहे. काँग्रेसच्या विशाल पाटलांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलंय. काँग्रेसचा गड राखायचा लढायचं आणि जिंकायचं असं आवाहन पत्रात करण्यात आलं आहे.