सांगली समाचार - दि ६ एप्रिल २०२४
सांगली - सांगली लोकसभा विनिंग मेरीट'च्या आधारावरच ठरली गेली पाहिजे, या मुद्द्यावर काँग्रेस ठाम आहे. शिवसेना ठाकरे गटाने घाईघाईत सांगलीची उमेदवारी का जाहीर केली, काँग्रेसची बांधणी घट्ट असताना शिवसेना हट्ट का करते आहे, पश्चिम महाराष्ट्रात मशाल पेटवायची होती तर ती हातकणंगलेत पेटली आहे, मग सांगलीसाठी आग्रह का, या प्रश्नांची उत्तरे खासदार संजय राऊत यांना पुढील चार दिवसांच्या सांगली मुक्कामात द्यावी लागणार आहेत.
हे प्रश्न सुटल्याशिवाय महाविकास आघाडीतील पक्षांची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची मने जुळणार नाहीत. काँग्रेसला किंवा वसंतदादा गटाला वजा करून सांगली लोकसभेला भाजपच्या विरोधात निवडणूक उभी राहणे कठीण आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा 'नोटा'ला मतदान अधिक झाले होते. जिल्हा प्रमुखांवर डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली होती. तो इतिहास राऊतांना अवगत असल्याची आठवण काँग्रेसचे समर्थक करून देत आहेत.
ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केल्याने त्यांना ती रेटण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. काँग्रेस आणि विशेषतः विशाल पाटील यांच्या अस्तित्वासाठी ही लढाई महत्त्वाची मानली जातेय. वसंतदादा घराण्याला राजकारणातून जाणीवपूर्वक मागे ढकलले जात असल्याचा आरोप त्यांचे समर्थक करत आहेत. अशावेळी 'हात' द्या, अशा हाक त्यांनी काँग्रेसला दिली आहे. तो मिळाला नाही तर विशाल पाटील बंडखोरी करून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्या बंडाला विश्वजीत यांची साथ असेल का, हा कळीचा प्रश्न बाकी आहे.
सध्या विश्वजित यांच्या तोंडी 'आघाडी धर्म' हे वाक्य येताना दिसते आहे, मात्र प्रत्यक्षा विशाल बंड करतील त्यावेळी विश्वजित यांची भूमिका काय असेल, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सांगलीत लढत टोकदार होणार आहे. ती २०१९ प्रमाणे तिरंगी झाली तर भाजपचा फायदा व्हायला नको, अशी भूमिका भाजप विरोधी मतांचे एकीकरण करू पाहणारे मांडत आहेत. खासदार संजय राऊतांच्या दौऱ्यात ते शिवसेनेची नव्याने बांधणी करणार आहेत? प्रचार वेगवान करणार आहेत? काँग्रेसची समजूत काढणार आहेत?
विशाल पाटलांचे समर्थक फोडून शिवसेनेत घेणार आहेत की अन्य घटक पक्षांना सोबत घेत काँग्रेस वगळून पुढे जाणार आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. काँग्रेसच्या बांधणीला शिवसेना आव्हान देऊ शकेल का? उमेदवारी जाहीर करून घेतलेली आघाडी प्रचारात टिकवण्याचे कठीण आव्हान सध्या चंद्रहार पाटील यांना पेलावे लागत आहे. त्याला राऊतांचा हातभार किती लागतो, याकडे लक्ष असेल.
सामंतांची झाकली मूठ
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगलीतील शिवसेनेची उमेदवारी जाहीर करण्यामागच्या ठाकरेंच्या खेळीचा पंचनामा केला जाईल, असे आव्हान दिले आहे. सामंतांची झाकली मूठ सव्वा लाखाची आहे. ती निवडणुकीनंतर उघडेल, मात्र त्या मुठीत शिरून काही हाती लागते का, याचा प्रयत्न काँग्रेसवाले करण्याच्या तयारीत दिसत आहेत.
तुम्हारे पास क्या है ?
सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत 'विनिंग मेरीट'वर बोलण्याची सुरुवात आमदार विश्वजित कदम यांनी केली. अँग्री यंन मॅनच्या रुपात त्यांनी प्रश्न केला... सांगली मतदारसंघात शिवसेनेची ताकद किती? जिल्हा परिषद सदस्य किती? पंचायत समिती सदस्य किती? ग्रामपंचायतीत थेट सरपंच किती... तुलनेत काँग्रेसचे दोन आमदार आहेत. जिल्हा परिषदेला पंधरा सदस्य, महापालिकेत २३ नगरसेवक होते. पलूस, कडेगाव, जत, मिरज आणि सांगली येथे काँग्रेसचा भाजपच्या तोडीस तोड प्रभाव आहे... आता सांगा, 'संजय राऊत साहेब, तुम्हारे पास क्या है?' या प्रश्नाचे उत्तर राऊतांना द्यावे लागेल.
भाजपचा पराभव हा महाविकास आघाडीचा मुख्य अजेंडा असेल तर या मुद्द्यावर सांगली काँग्रेसनेच लढली पाहिजे, या मतावर काँग्रेसचे प्रदेश, राष्ट्रीय नेते ठाम आहेत. खासदार संजय राऊत हेदेखील 'मेरीट'च्या मुद्द्यावर काँग्रेस येथे मजबूत असल्याचे मान्य करतात. मात्र, ही ताकद शिवसेनेला द्या, असे आवाहन ते करतात. अशी ताकद 'शिफ्ट' होऊ शकते. मात्र, काँग्रेसच्या हक्काच्या उमेदवारावर, वसंतदादा पाटील यांच्या नातवावर राजकीय कूटनीती करून अन्याय केला जातोय, अशी भावना बळावलेली असताना ते शक्य होईल का ?