| सांगली समाचार वृत्त |
अकोला - दि.२४ एप्रिल २०२४
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर अकोल्यातील सभेत जोरदार हल्ला केला. या सभेत त्यांनी काँग्रेसच्या दहा वर्षांच्या सत्ता काळात महाराष्ट्राला काय मिळाले, असा प्रश्न उपस्थित केला. तर भाजपच्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्राला किती मदत मिळाली. याची आकडेवारी जाहीर केली. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे अमित शाह यांनी सर्व औपचारिकता सोडून थेट भाषणाला सुरुवात केली. बटन अकोल्यात दाबा करंट इटलीत लागला पाहिजे, असे म्हणत त्यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार केला.
या सभेत शाह यांनी उद्धव ठाकरे हे पुत्र मोहात अडकल्याचे सांगत त्यांच्यावर कुठलेही भाष्य केले नाही. तर थेट शरद पवार यांच्यावर टीका करत सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला काय मिळाले, याचे उत्तर मागितले. तर त्याचे उत्तर आपण सोबत आणल्याचा दावा शाह यांनी सभेत केला. दहा वर्षांत काँग्रेस सरकारने महाराष्ट्राला 1 लाख 91 हजार कोटी दिले. भाजपाने 7 लाख 15 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. 2 लाख 90 हजार कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी, 75 हजार कोटी रुपये रस्त्यांच्या निर्माणासाठी तर दोन लाख कोटी रुपये रेल्वेसाठी आणि चार हजार कोटी विमानतळ विस्तारासाठी दिल्याचा दावा अमित शाह यांनी केला.
भारतात भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आल्याचा दावा अमित शाह यांनी केला. हा दावा करताना अमित शाह हे मुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना विसरले की काय, असा प्रश्न उपस्थित होत होता. दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळ ठोकला होता, याचा भाजप नेत्यांना कसा काय विसर पडला असा प्रश्न या निमित्त विचारला जाऊ शकतो. या सभेला वाशीमच्या माजी खासदार, शिवसेना नेत्या भावना गवळी यांची उपस्थिती होती, तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेला संबोधित केले.
अकोला लोकसभा निवडणुकीत कमळाला मतदान केले, तर या लोकसभेत मोदी सरकारच्या माध्यमातुन 15 लाख लोकांना मोफत धान्य मिळत राहील. गेल्या काळात 6 लाख आयुष्मान भारत कार्ड तयार करण्यात आले. 2 लाख 72 हजार शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. अकोल्यात 1 लाख 96 हजार लोकांच्या घरात शौचालय निर्माण करण्यात आले. 1 लाख नळ कनेक्शन दिले आहे. 26 तारखेचे मत हे विकसित भारतासाठी आहे. या देशात मोदींजीचा जाहीरनामा दिला. त्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे की, नाही अशी विचारणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित लोकांना केली.
काँग्रेस काळातील दहशतवाद आणि बाॅम्बस्फोट थांबविण्यात मोदी सरकारला यश आल्याचे शहा म्हणाले, तर काँग्रेसने गेली अनेक वर्षे थांबविलेले अयोध्येतील राम मंदिर मोदी सरकारमुळे तयार झाल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसने देशाचे स्थान अकराव्या स्थानावर सोडले होते. ते आर्थिकदृष्ट्या पाचव्या स्थानावर आले आहे. मोदी सरकार आले तर ते तिसऱ्या स्थानावर येईल याचा फायदा प्रत्येक भारतीयाला होईल, असा दावा शाह यांनी केला. पैनगंगा, नळगंगा नदी जोड प्रकल्पातून विदर्भाचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे अमित शाह म्हणाले. यातून चार लाख हेक्टर बारमाही सिंचनाची सोय होईल असेही शाह म्हणाले.