yuva MAharashtra मायेला मुकलेल्या चिमुकल्यांसाठी ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते' प्रभावी

मायेला मुकलेल्या चिमुकल्यांसाठी ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते' प्रभावी



सांगली समाचार- दि. १३ एप्रिल २०२४
मुंबई - आपल्या आई -वडिलांपासून ताटातूट झालेली, घरातून निघून गेलेली, हरवलेल्या अल्पवयीन मुला-मुलींना पुन्हा आपले आई-वडील, घर मिळावे यासाठी 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेच्या सुरक्षारक्षक बलाच्या जवानांनी गेल्या वर्षभरात १०६४ बालकांची सुटका केली आहे.

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयातून 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्‍थानके, फलाटावरील १०६४ मुलांची सुटका करण्‍यात आली आहे. एकट्या भुसावळ विभागातून ३१३ मुलांची सुटका करण्यात आली आहे. चाईल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी भेट घडवून आणण्‍यात आली आहे.


भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर आदींच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित सुरक्षा रक्षक बलाच्या जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी जवळीक साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात.मध्‍य रेल्‍वेच्‍या मुंबई विभागातून ३१२ तर भुसावळ विभागातून ३१३, पुणे विभागातून २१०, नागपूर विभागातून १५४ तर सोलापूर विभागातून ७५ मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.