सांगली समाचार - दि. ११ एप्रिल २०२४
कोल्हापूर - शक्तीपीठ महामार्ग फक्त धर्माच्या नावाखाली घटनाबाह्य काम आहे. १२ जिल्ह्यातील ४० हजार एकर जमीन कंत्राटदारांना हाताशी धरून बरबाद करण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे १५ लाख क्विंटल धान्याचे उत्पादन थांबणार आहे. तसेच नागपूरहून गोव्याला दारू आणि जुगार खेळण्यासाठी या मार्गाचा उपयोग होणार आहे.
यालाच विरोध करण्यासाठी मुंबईत जनहित याचिका दाखल करून वकीलांची फौज काम करणार असल्याची माहिती माजी न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांनी काल (दि.१०) दिली. याचिका दाखल करण्यासाठी खूप पैशाची गरज नाही. केवळ दोन हजार रुपये लागणार आहेत. तेही मी खर्च करण्यास तयार असल्याची माहिती नलावडे यांनी स्पष्ट केले.
शाहू स्मारक भवनात अहवाल शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडे त्यांनी अहवाल सादर केला. शक्तीपीठ महामार्गाविरोधात जनसुनावणी अहवालचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर नलावडे म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग तीन धार्मिक स्थळाच्या जवळून जाणार हे पूर्णतः चुकीचे आहे. यासाठी भूसंपादनासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब राज्य सरकारने केलेला नाही. शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ २१ तासांवरून केवळ आठ तास होईल, हा सरकारचा दावा खोटा आहे. काहीही झाले तरी प्रवासाचा वेळ १५ तासांपेक्षा कमी होणे शक्य नाही. या महामार्गावर एक लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. हा सामान्यांचा पैसा आहे. इतके पैसे खर्च करून शेतकरी, गरिबांचे भले होणार नसल्याचे मत नलावडे यांनी व्यक्त केले. हुकूमशाही पद्धतीने ही प्रक्रिया राबवली आहे. यामुळे न्यायालयात या प्रक्रियेला स्थगिती मिळू शकते. सरकारी पैशाची व उधळपट्टी करून ते पैसे येत्या विधानसभा निवडणुकीत वापरण्यासाठी हा महामार्ग केला जाणार आहे. या विरोधात शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. महामार्ग रद्द होण्यासाठी रस्त्यावरील लढाईसह न्यायालयीन लढाही लढण्यात येईल. अहवाल समितीचे सदस्य बी. एम. हिर्डेकर म्हणाले, अनेक वाड्या-वस्त्या विकासापासून वंचित आहेत. त्यांचा विकास करण्याऐवजी शेतकऱ्यांना श्रीमंतासाठी उद्ध्वस्त करून शक्तीपीठ महामार्ग होणार आहे.
माजी प्राचार्य टी. एस. पाटील म्हणाले, ठेकेदार, सिमेंट, सळ्यांच्या कंपन्यांच्या भल्यासाठी शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यात येणार आहे. माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाविरोधात तीव्र लढा देण्यासाठी शेतकरी सज्ज आहेत. यावेळी प्रा. सुभाष जाधव, शिवाजी मगदूम आदी उपस्थित होते.