yuva MAharashtra विशाल पाटील यांची अखेर बंडखोरी विरोधकांची डोकेदुखी वाढणार

विशाल पाटील यांची अखेर बंडखोरी विरोधकांची डोकेदुखी वाढणार



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१६ एप्रिल २०२४
सांगलीत भाजपचे खासदार संजय पाटील विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील अशी लढत अपेक्षित होती. महाविकास आघाडीतील नाट्यमय घडामोडीनंतर सांगलीच्या रिंगणातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील मैदानात उतरले आहेत.

ज्या वंचित बहुजन आघाडीचा चंद्रहार पाटील यांनी पाठिंबा घेतला होता, त्याच 'वंचित'च्या पाठबळावर आता विशाल पाटील यांनी बंडाची घोषणा केली आहे. विशाल यांची बंडखोरी शेवटपर्यंत टिकल्यास सांगलीची समीकरणे बदलणारी ठरू शकते.

सांगलीतील निवडणूक स्थानिक मुद्यांवर रंगण्याची चिन्हे आहेत. वास्तविक, येथे महाआघाडीत मेरिट काँग्रेसचे असताना शिवसेना ठाकरे पक्षाने या जागेवर आपला उमेदवार दिल्याने काँग्रेसच निवडणुकीतून हद्दपार झाली आहे.


त्यामुळे वसंतदादा पाटील घराण्याची कोंडी, बाह्यशक्तींकडून विशाल पाटलांचा राजकीय गेम आणि त्यातून निर्माण झालेला स्थानिक संघर्ष असे चित्र निर्माण झाले आहे. दुसऱ्या बाजूला भाजपने संजय पाटील यांना तिसऱ्यांदा दिलेली उमेदवारी पक्षातील अनेकांना रुचलेली नाही.

विशाल पाटील यांच्या बंडामुळे सांगलीत मराठा, धनगर आणि ओबीसी मतांची दिशा काय, याबाबत उत्सुकता आहे. २०१९ मध्ये झालेली तिरंगी लढत संजय पाटील यांच्या पथ्यावर पडली होती. यावेळी लढत तिरंगी असली तरी तीनही उमेदवार मराठा समाजाचे असल्याने जातीय समीकरणांची किनार नसेल. शहरी मतदारांवरील भाजपचा प्रभाव आणि संजय पाटील यांनी टेंभू, म्हैसाळ योजनेतून पाण्यासाठी केलेली धडपड या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

चंद्रहार यांची पाटी कोरी आहे, मात्र त्यांची मदार उसनवारीवर आहे. जयंत पाटील यांची ताकद, नियोजन, यंत्रणा त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. आमदार विश्‍वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील या सर्वांना शिवसेना ठाकरे पक्षाने संपर्क साधत आघाडी धर्मपालनाचे आवाहन केले आहे. आर. आर. पाटलांचा गट अजून संभ्रमावस्थेत आहेत.

विशाल यांच्या बंडाला या सगळ्यांनी छुपा पाठिंबा दिला तर चंद्रहार यांची अवस्था 'अभिमन्यू'सारखी होऊ शकते. विशाल यांचे बंड सगळी समीकरणे बदलणारे ठरू शकते. अर्थात, भाजपची प्रमुख ताकद मैदानात उतरलेली नाही. भाजपचा धडाका सुरू होईल, तेव्हा विशाल यांच्याबद्दलच्या सहानुभुतीचे काय होते, यावर बरेच चित्र अवलंबून असेल.