| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि.१४ एप्रिल २०२४ -
लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून महाविकास आघाडीत जागावाटपही करण्यात आल्या आहेत. मात्र काही जागांवरून कॉंग्रेसचे नेते नाराज असल्याचे दिसुन येत आहेत. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कॉंग्रेसला चांगलचं सुनावलं आहे. ते महाविकास आघाडीचे नागपुरचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी आले असता बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात आघाडी झाली पाहिजे म्हणून शरद पवारांनी विद्यमान चार खासदार असताना देखील १० जागांवर समाधान मानले. तुमचा एक खासदार असताना १७ जागा मिळाल्या, तरी समाधानी नसाल तर जरा अवघड होईल. कॉंग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीने वर्धेची जागा हिसकावून घेतली, असे वाटते. हा न्युनगंड बाजूला ठेवा. आता आपली मजबूत आघाडी असल्याचा सल्लाही यावेळी पाटलांनी कॉंग्रेसला दिला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आमची रामटेकची हुकूमी जागा होती. पण ती आम्ही सोडून दिली. किती त्याग करायचा. पण आता आघाडी झाली आहे. ठामपणाने सर्व घटक पक्ष काम करीत आहे. कोणतेही मतभेद राहिले नाहीत. कॉंग्रेस पक्षाने अतिशय चांगला जाहीरनामा मांडला आहे. आजपर्यंत इतका उत्तम जाहीरनामा कोणत्याही पक्षाने काढलेला नाहीय. भाजप सरकराने केलेल्या चुका भरून काढण्याचे काम या जाहीरनाम्यातून होणार आहे. गुंतवणूकीच्या बाबतीत महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. त्यामुळे आयआयटी पवई, मुंबईे येथील ३६ टक्के मुलांना देखील नोकऱ्या मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, वर्ध्याची जागा ही कॉंग्रेसला हवी होती. मात्र जागावाटपात ती शरद पवार गटाला मिळाली. याठिकाणी शरद पवारांनी अमर काळे यांना आपली लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कॉंग्रेसने या जागेवर दावा सांगितला होता. यावरून जयंत पाटलांनी कॉंग्रेसला सुनावलं आहे.