| सांगली समाचार वृत्त |
अहमदनगर दि.२० एप्रिल २०२४
राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये प्रमुख लढत आहेत. या दोन्ही आघाडी आणि युतीमध्ये तीन-तीन पक्ष आहेत. महाविकास आघाडीत 22, 16 आणि 10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यामध्ये ठाकरे यांच्या शिवसेनाला 22, काँग्रेसला 16 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळाल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या चर्चेला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी कमी जागा लढवण्यासंदर्भात आपली रणनीती सांगितली. शरद पवार यांनी आपले लक्ष्य लोकसभा नाही तर विधानसभा असल्याचे सांगितले.
काय म्हणाले शरद पवार
शरद पवार अहमदनगर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभेचा राष्ट्रवादी फक्त दहा जागांवर उमेदवार देत आहे, त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सन 2019 मध्ये आमचे चार खासदार होते. परंतु आमचे लक्ष लोकसभा नाही तर विधानसभा आहे. लोकसभेसाठी कमी जागा घेऊन विधानसभेला अधिक जागा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमार्फत जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे लोकसभेत आम्ही कमी जागा घेतल्याचे शरद पवार म्हणाले.
दहा वर्ष तुमची सत्ता होती…
अजित पवार आणि भाजप नेते गेल्या दहा वर्षांत बारामतीचा विकास झाला नाही, अशी टीका करत आहेत. त्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, २०१४ ते २०२३ या दहा वर्षांत सत्तेचा अधिकार त्यांच्याकडे होता. त्यांनी या दहा वर्षांत काय केले, हे सांगितले पाहिजे. यावेळी शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनाही सोडले नाही. ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात सारखे फिरत असात…आता कोणत्या पक्षात आहेत, आता कोणत्या पक्षात आहे, असे मिश्किलपणे त्यांनी माध्यमांना विचारले.
बारामती शरद पवार ज्या मैदानावर सभा घेतात, ते मैदान अजित पवार गटाने बुक केले आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, मैदान महत्वाचे विचार नाही, विचार महत्वाचा आहे.