| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२६ एप्रिल २०२४
एका विवाहित जोडप्याच्या मालमत्तेशी संबंधित एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, पत्नीच्या 'स्त्रीधन' (स्त्रींच्या मालमत्तेवर) पतीला अधिकार नाही. 10 वर्षांहून अधिक जुन्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. पीडित महिलेच्या प्रकरणाची न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. पत्नीच्या 'स्त्रीधन'वर पतीच्या नियंत्रणाबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.
न्यायालयाने म्हटलं आहे की, संकटाच्या वेळी पती पत्नीचे स्त्रीधन वापरू शकतो, परंतु तिची मालमत्ता परत करणे, हे त्याचं नैतिक कर्तव्य आहे. एका महिलेला तिच्या हरवलेल्या सोन्याच्या बदल्यात २५ लाख रुपये परत करण्याचे निर्देश देताना न्यायालयाने ही महत्त्वाची बाब निर्णयात सांगितली. या प्रकरणात, महिलेने दावा केला आहे की, तिच्या कुटुंबीयांनी तिला लग्नाच्या वेळी ८९ सोन्याची नाणी भेट दिली होती. तसेच लग्नानंतर तिच्या वडिलांनी पतीला दोन लाखांचा धनादेश दिला होता.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने घटनेच्या कलम १४२ अन्वये अधिकार वापरत पत्नीचे सर्व दागिने हिसकावून घेतल्याबद्दल पतीला २५ लाख रुपयांची आर्थिक भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. राहणीमानाच्या खर्चात झालेली वाढ, समानता आणि न्यायाचे हित लक्षात घेऊन याचिकाकर्त्या पीडित महिलेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीडित महिलेचे वय सध्या ५० वर्ष आङे.
सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाने ५ एप्रिल २०२२ रोजी दिलेला निर्णय रद्द केलाय. ज्यामध्ये घटस्फोट मंजूर करताना पतीकडून सोन्याची किंमत म्हणून ८ लाख ९० हजार रुपये वसूल करण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा २०११ चा आदेश रद्द केला आहे.
एका नवविवाहित महिलेचे लग्नानंतर पहिल्या रात्रीच सर्व सोन्याचे दागिने हिरावून घेणे विश्वसनीय नाही, हा उच्च न्यायालयाचा युक्तिवाद खंडपीठाने फेटाळला आहे. लोभ हे एक मोठे कारण आहे. ते गुन्हे करण्यास प्रवृत्त करते, असं खंडपीठाने म्हटलं आहे.
या प्रकरणात पत्नीने दावा केला होता की, २००३ मध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री तिच्या पतीने तिचे सर्व दागिने तिच्या सासूकडे सुरक्षित ठेवण्यासाठी नेले होते. २००६ मध्येच पती-पत्नीचे नाते संपुष्टात आले होते. पत्नीच्या मालमत्तेवर पतीला मालक म्हणून अधिकार नाही. न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, एखाद्या महिलेला लग्नापूर्वी, लग्नाच्या वेळी किंवा विभक्त होण्याच्या वेळी किंवा त्यानंतर भेटवस्तू दिलेली मालमत्ता ही 'स्त्रीधन' मालमत्ता आहे. ही स्त्रीची संपूर्ण मालमत्ता आहे. यावर नवऱ्याचे नियंत्रण नाही.