सांगली समाचार - दि ४ एप्रिल २०२४
भारतीय रेल्वेचे जाळे जगातील सर्वात मोठे आहे. आपल्या देशात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेला देशाची ‘लाईफ लाईन’ म्हणून ओळखले जाते. भारताचा लांब रेल्वे नेटवर्क मध्ये जगात चौथा क्रमांक लागतो. भारतात रेल्वेचा प्रवास हा सर्वात सोपा आणि सोयीस्कर प्रवास मानला जातो. त्यामुळे दैनंदिन जीवनात प्रवासासाठी भारतातील लोकांचा कल रेल्वेकडे असतो. रेल्वेबाबत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या लोकांना अजुनही माहिती नाही.
भारतातील अनेक रेल्वे स्थानके अतिशय सुंदर आहेत, परंतु अशी काही स्थानके आहेत ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. भारतामध्ये अनेक रेल्वे स्थानके आहेत, त्यांची नावे देखील खूप वेगवेगळी आणि मजेशीर आहेत. काही रेल्वे स्थानकांची नावे फार मोठी आहेत, तर काही रेल्वेस्थानकांची नावे अगदी लहान आहेत. भारतातील सर्वात मोठे नाव असलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आज आपण भारतातील सर्वात मोठ्या नावाच्या रेल्वे स्थानकाबद्दल जाणून घेऊया…
रेल्वे स्थानकाचे नाव काय आहे ?
आंध्र प्रदेशातील ‘वेंकटनरसिंहराजूवरीपेटा’ रेल्वे स्टेशन हे भारतातील सर्वात लांब रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जात होते. भारतातील सर्व रेल्वे स्थानकांची नावे या रेल्वे स्थानकापेक्षा लहान आहेत. हे रेल्वे स्थानक नावाने प्रसिद्ध आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, या नावाच्या स्पेलिंगमध्ये २८ अक्षरे आहेत. यावरून रेल्वे स्थानकाचे नाव किती मोठे आहे याचा अंदाज बांधता येतो. हे नाव उच्चारायला सोपे जावे, म्हणून लोक त्याला ‘वेंकटनरसिंह राजुवरीपेट’ या नावानेही संबोधतात. हे स्थानक हे आंध्र प्रदेशाच्या चित्तूर जिल्ह्यात तामिळनाडू राज्याच्या सिमेवर आहे.
तर दुसरीकडे देशातील सर्वात लहान रेल्वे स्थानकाबद्दल बोलायचे झाले तर हे नाव फक्त दोनच अक्षरांचे आहे. या रेल्वे स्थानकाचे नाव इब (IB) आहे, जे केवळ दोन अक्षरांनी बनलेले आहे. भारतीय रेल्वे नेटवर्कमधील हे एकमेव स्थानक आहे, ज्याचे नाव इतके लहान आहे. इब (IB) हे भारताच्या ओडिशा राज्यातील एक रेल्वे स्थानक आहे.