| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१९ एप्रिल २०२४
आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सध्या देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात अनेक भेटीगाठी घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजींची भेट घेतली. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सांगलीच्या दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे हेलिकॉप्टराने कवलापूर विमानतळावर दाखल झाले. यावेळी विमानतळावर संभाजी भिडे उपस्थित होते. फडणवीस हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर संभाजी भिडे त्यांना भेटले. यानंतर संभाजी भिडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीवेळ चर्चा झाली. संभाजी भिडे हे देवेंद्र फडणवीस यांचा हात धरून त्यांना काहीतरी सांगत होते. यानंतर देवेंद्र फडणवीस किंचित खाली झुकले आणि संभाजी भिडे यांनी त्यांच्या कानात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. सांगली लोकसभेच्यादृष्टीने या दोघांमध्ये काही चर्चा झाली असावी का, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.