yuva MAharashtra सांगली पुन्हा काँग्रेसकडे येण्याची शक्यता ? पण, यासाठी जोरदार 'फाईट'ची गरज !

सांगली पुन्हा काँग्रेसकडे येण्याची शक्यता ? पण, यासाठी जोरदार 'फाईट'ची गरज !



सांगली समाचार - दि. १२ एप्रिल २०२४
सांगली - ठाकरे शिवसेनेने कोल्हापूरच्या बदल्यात सांगली आपल्याकडे खेचून घेतली. यावरून अजूनही ठाकरे- राऊत आणि काँग्रेसचे नेते यांच्यात 'तू-तू मैं-मैं' सुरू आहे. पण ज्या न्यायाने ठाकरे गटाने कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीवर कब्जा केला, त्याच न्यायाने उत्तर मध्य मुंबईच्या बदल्यात ठाकरेंकडून सांगली सोडवून घेता येऊ शकते, गरज आहे ती ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठांशी दोन हात करण्याची.

महाआघाडीच्या जागा वाटपात अनेक तिकडंबाजी झाली. जिथं ठाकरे शिवसेनेची अजिबात ताकद नाही, ती सांगली आपल्याकडे खेचून घेतली खरं, पण प्रचारार्थ कितीही आघाडी घेतली असली तरी, प्रत्यक्षात मतदारांची सहानुभूती दिसते आहे ती विशाल पाटील यांच्या बाजूने.

त्याचप्रमाणे हातकणंगले मतदारसंघात दादा गटाने उचल खाल्ली आहे. तेथील ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील यांच्या प्रचारात अजूनही दोन्ही तालुक्यातील दादा गटाचा कार्यकर्ता सक्रिय सहभागी झालेला नाही. आणि इथे काँग्रेसला व दादा घराण्याला मानणारा मोठा मतदार आहे, जो सत्यजित पाटलांच्या विजयात अडसर ठरू शकतो. ही जाणीव ठाकरे शिवसेनेच्या या भागातील नेत्यांना आहे. ही वस्तुस्थिती संजय राऊत यांच्या कानावर गेल्याने, त्यांचा तीळपापड होतो आहे. मात्र ही वस्तुस्थिती ठाकरे यांच्या कानावर गेली नसेल तर ती ठाकरेंपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सांगलीतील काँग्रेस नेत्यांची आहे. त्यामुळे 'एका सांगलीच्या बदल्यात सांगली व हातकणंगले या दोन्ही जागा धोक्यात आणायच्या का ?' ही बाजू ही ठाकरे यांना पटवून देण्याची आवश्यकता आहे. ही झाली नाण्याची एक बाजू.


आता नाण्याची दुसरी बाजू. जागा वाटपात उत्तर मध्य मुंबई काँग्रेसच्या वाट्याला आली. परंतु तेथे लढण्यासाठी ज्या संजय निरुपम या तगड्या उमेदवाराची शक्यता होती, त्यांनाच काँग्रेसने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सध्या या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी पाच ठिकाणी महायुतीचे प्राबल्य आहे. केवळ मालाड पश्चिम या विधानसभा मतदारसंघात असलम शेख यांच्या रूपाने एकमेव काँग्रेसचा आमदार आहे.

गतवेळी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर या सेलिब्रिटीचा साडेचार लाख मताधिक्याने पराभव करून, विजय खेचून आणलेल्या भाजपाच्या विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता काटला व केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे खा. गोपाल शेट्टी नाराज आहेत. मात्र ठाकरे शिवसेनेने दक्षिण मध्य मुंबईवर दावा करीत उत्तर मध्य मुंबईची जागा काँग्रेसला बहाल केली. जिथे काँग्रेसला उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करावी लागते आहे. काँग्रेसने ठाकरे शिवसेनेच्याच विनोद घोसाळकर यांना काँग्रेसचा 'हात' हातात घेण्याचा आग्रह फेटाळून लावला. आता येथील स्थानिक शिवसैनिकांनी हा मतदारसंघ स्वतःकडे घेण्यासाठी ठाकरेंकडे हट्ट धरला आहे. येथील ठाकरे शिवसेनेची ताकत आणि नाराज गोपाळ शेट्टी यांची मदत ठाकरे शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांच्या गळ्यात विजयाची माळ घालू शकते. परंतु काँग्रेसकडून येथे कॉंग्रेस वर्षा गायकवाड यांच्या नावाचा विचार करीत आहे, या जागेसाठी कॉंग्रेसमधून नसीम खान, भाई जगताप यांच्या नावाचीही चर्चा आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील व महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी बुलेट ट्रेनच्याही अधिक वेगाने ही गोष्ट, केंद्रीय नेतृत्वाच्या कानावर घालण्यासाठी दिल्ली गाठायला हवी आणि उत्तर मध्य मुंबईच्या बदल्यात सांगली आपण ताब्यात घेऊ शकतो आणि तेथे विजयही संपादन करू शकतो, यासाठी हट्ट धरायला हवा.

कदाचित याच 'जर तर' शक्यतांचा विचार करून डॉ. विश्वजीत कदम प्रयत्नशील असल्याने विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्यास विलंब होत असावा. या दोन्ही शक्यता ठाकरे यांनी फेटाळल्यास विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरू शकतात.