yuva MAharashtra शासनाच्या मदतीशिवाय दूर केला दुष्काळ, दुष्काळी भागाने घेण्यासारखा दहिगावचा आदर्श

शासनाच्या मदतीशिवाय दूर केला दुष्काळ, दुष्काळी भागाने घेण्यासारखा दहिगावचा आदर्श



सांगली समाचार - दि. ११ एप्रिल २०२४
कोरेगाव - कोणत्याही लोकप्रतिनिधीवर अवलंबून न राहता गावचा विकास करणारे कोरेगाव तालुक्यातील दहीगाव हे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच चर्चेत राहिला आहे. सध्या पडलेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी या गावाने 10 ते 12 लाख रुपयांची विहीर खोदून आपल्या गावाचा पाणीप्रश्न निकालात काढला आहे. यापूर्वी गावातील अनेक कामे अगदी वसना नदीवरील पूलदेखील लोकसहभागातून साकारण्यात आला आहे. 


सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. दहीगावातही पंधरा दिवसांपासून एक दिवसाआड पाणी मिळत आहे. उन्हाळ्याचे अजून दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे पाण्याची परिस्थिती आणखी बिकट होईल. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी गावाने पंधरा दिवसांपूर्वी बैठक घेतली आणि या बैठकीत गावच्या पाण्यासाठी नवीन विहीर खोदण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या कामासाठी लोकवर्गणी जमा झाली आणि गावासाठी विहीर खोदण्यात आली. ग्रामस्थांच्या या प्रयत्नांनाही यश आले आणि विहिरीला चांगले पाणी लागले. त्यामुळे या सध्या तरी दहीगावचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नदी परिसरात नवीन खोदलेली विहीर मजबूत व्हावी, यासाठी आता या विहिरीचे बांधकाम करण्याची गरज असल्याने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या कामाचा शुभारंभ ग्रामस्थांच्याच उपस्थितीत करण्यात आला.