yuva MAharashtra दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका आता ऑनलाईन तपासणार

दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका आता ऑनलाईन तपासणार



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२९ एप्रिल २०२४
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन' (सीबीएसई) ने मोठा निर्णय घेतला आहे. आता सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आपल्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासू शकतील. तसेच त्यांना उत्तरपत्रिकेवर दिलेल्या गुणांचे मूल्यांकन करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना एक लिंक दिली जाईल, ज्याद्वारे ते उत्तरपत्रिकेतील गुण पाहू शकतील. बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 500 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

सीबीएसईने उमेदवारांना कमी गुण मिळाल्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बोर्डाच्या वेबसाईटवर एक लिंक दिली जाईल, ज्याद्वारे विद्यार्थी नोंदणी केल्यानंतर परीक्षकांनी दिलेले गुण तपासू शकतील. लिंक ओपन झाल्यानंतर फक्त पाच दिवसांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती देखील घेऊ शकतात. यासाठीही अर्ज करावा लागेल. यासाठी 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रतिविषय 700 आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना प्रति विषय 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.


…तर परीक्षकांवर कारवाई

एखाद्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत कमी गुण दिल्याचे आढळून आल्यास अशा परीक्षकांवर बोर्ड कारवाई करेल. हलगर्जीपणा करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सीबीएसईचा निकाल जाहीर होऊ शकतो. यावेळीही गुणवत्ता यादी जाहीर होणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या एकूण गुणांची माहिती दिली जाईल.