| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२४ एप्रिल २०२४
अनेकांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न करूनही विशाल पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली असून, भाजपाकडून संजयकाका पाटील रिंगणात आहेत. तर अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडणूक लढवणार आहेत. यातच सांगलीतील बंडखोरी पक्षाच्या हाताबाहेरील आहे, असे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही बंडखोऱ्या या पक्षाच्या हातात राहत नाहीत. त्याला काही इलाज नाही. आता ही निवडणूक जशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने होणार. सांगलीतील बंडखोरी ही आमच्या हाताबाहेर असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
भाजपाच्या पायाखालची वाळू सरकरली
भाजपचे नेते या निवडणुकीदरम्यान खालच्या पातळीवरती टीका करत आहेत. मंगळसूत्रापर्यंत टीका करणे पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला शोभत नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा तोल जात आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
ही लढाई जनतेची, अस्तित्वाची, स्वाभिमानाची आहे. माझ्या उमेदवारीला अनेक अडथळे आणायचा प्रयत्न. कोणत्याही आमिषाला बळी न पडता अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाचा विचाराचा उमेदवार आहे. मी स्वार्थ पाहिला नाही. जनतेकडे आम्ही स्वाभिमानाने जाऊ शकतो. मला चिन्ह मिळू नये, माझे बॅलेट मशिनवर नाव सर्वांत खाली यावे, असेही प्रयत्न झाले. हे सगळे कोण करतय याचा लवकर खुलासा करू, असे विशाल पाटील यांनी म्हटले होते.
दरम्यान काँग्रेसचे विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीतून बंडखोरी केल्याने उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांची तातडीची बैठक गुरूवार दि. २५ एप्रिल रोजी सांगलीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पाटील यांनी पक्षाने उमेदवारी दिलेली नसताना लोकसभा निवडणुकीत आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मविआबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असून पक्षाची अधिकृत भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस पक्षाचे आमदार व पदाधिकारी यांना आमंत्रित करण्याच्या सूचना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांना देण्यात आल्या आहेत.
विशाल पाटील यांनी बंडखोरी करून आपली उमेदवारी कायम ठेवल्याबद्दल त्यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता पक्षिय पातळीवरून व्यक्त केली जात असून उबाठा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी तशी मागणीही काँग्रेसकडे केली आहे. यामुळे या बैठकीत पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्ष आ.पटोले यांच्याकडून कारवाई केली जाण्याची चिन्हे आहेत.