yuva MAharashtra सांगलीच्या खेळीचे 'खलनायक' जयंत पाटील... माजी आमदार विलासराव जगताप यांचा गंभीर आरोप !

सांगलीच्या खेळीचे 'खलनायक' जयंत पाटील... माजी आमदार विलासराव जगताप यांचा गंभीर आरोप !



| सांगली समाचार वृत्त |
जत - दि.२८ एप्रिल २०२४
सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद सुरू आहे. सांगलीची जागा काँग्रेसकडे जाऊ नये म्हणून काहींनी षडयंत्र रचले, ज्यात मी फसलो अशी कबुली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली होती. अशातच आता सांगलीच्या वादाचे खलनायक जयंत पाटील आहेत, असा गंभीर आरोप जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला आहे.

जतमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील तसेच माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना सांगलीच्या जागेवरुन विशाल पाटील यांना डावलण्यामागे जयंत पाटील यांची खेळी असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला.


काय म्हणाले विलासराव जगताप ?

"सगळ्या महाराष्ट्राची तिकीटे वसंतदादा पाटील यांच्या खिशात असायची. मात्र आज त्यांच्याच नातवाला दिल्ली, मुंबई, नागपूरचे हेलपाटे घालावे लागतात, ही दुखःद बाब आहे. काँग्रेस पक्षात चाललयं काय? कोणाचे ऐकून तुम्ही करता," असा सवाल विलासराव जगताप यांनी यावेळी उपस्थित केला.

जयंत पाटीलच खलनायक

तसेच "या सगळ्याचा कळीचा नारद कोण आहे, हे सर्वांना माहित आहे. ही सगळी खेळी जयंत पाटलांनी केली. सांगलीची काँग्रेसची जागा जाण्याच्या खेळीतील खलनायक जयंत पाटील आहेत. संजय राऊत यांच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी ही सगळी खेळी केली. जिल्ह्यातून वसंतदादा घराणे संपवण्याचा घाट राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घातलाय, मात्र आपल्याला वसंत पाटील यांच्या कुटुंबासोबत राहायचे आहे," असे आवाहनही त्यांनी केले.