| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२१ एप्रिल २०२४
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी जाहीर प्रचारात आघाडी घेतलेली आहे. संपूर्ण मतदारसंघात त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर घरोघरी जाऊन "अब की बार चारसो पार, सांगली मे संजय काका फिर एक बार !" ही टॅग घेऊन प्रचारात उतरले आहेत. स्वतः संजय काका यांनी जाहीर सभा ऐवजी प्रत्यक्ष भेटीगाठीवर जोर दिला असून त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सांगलीत जाहीर प्रचाराच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी संजय काकांसाठी जोरदार भाषणे केली. त्यांच्या या सभेचे हवा संपूर्ण मतदारसंघात दिसून आली.
दुसरीकडे काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळण्याची अपेक्षाभंग झाल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या विशाल दादांनी गनिमी काव्यांनी प्रचार सुरू केला आहे. त्यांच्यावर एका बाजूला पक्षाच्या शिस्तभंगाची तर दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांच्या "अपक्ष लढायचे- आता मागे नाही हटायचे " हा आग्रह आहे. त्याचप्रमाणे मोठा गाजावाजा करून व जाहीर सभातून 'पक्षातर्फे किंवा पक्षाविना लढण्याचे संकेत विशाल दादांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिले होते. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाचा हात सोडून अपक्ष लढण्याशिवाय विशाल दादांसमोर पर्याय उरलेला नाही. आणि म्हणूनच जाहीर प्रचार करण्याऐवजी विशाल दादांनी गनिमी काव्याने विविध पक्षांच्या नेतेमंडळींची भेट घेऊन बांधणे सुरू ठेवले आहे. 'आपल्या बंडखोरीची पक्षाला मोठी किंमत चुकवावी लागू शकते' ही सल त्यांच्या मनात असली तरी, पक्षाने किंवा महाआघाडीने मतदार संघातील वस्तुस्थिती न समजावून घेता, आपल्याला डावल्याचे शल्य मोठे आहे. आणि म्हणूनच कार्यकर्त्यांचा आग्रह व आपल्या बाजूने असलेली सर्वसामान्य मतदारांची सहानुभूती या जोरावर विशाल दादा मैदानात उतरून दोन्ही पाटलांना तसं देणार हे नक्की.
दरम्यान संजय काका व विशाल दादा या दोघांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीचे पै. चंद्रहार पाटील हे मात्र अद्याप बॅक फुटवरच असल्याचे पहावयास मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेली भव्य जाहीर सभा आणि त्यानंतर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमातून केलेला प्रचार दिसून येत आहे. त्यामुळे पै. चंद्रहार पाटील यांचा दोन्ही पाटलांच्या लढाईत बळी जातो की काय अशी शंका व्यक्त होत आहे.