| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२८ एप्रिल २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पै. चंद्रहार पाटील हे प्रचारात एकाकी पडल्याचे चित्र दिसत असून काल सांगली येथे संपन्न झालेल्या महाआघाडीच्या बैठकीत पाटील यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
सांगली येथे नुकताच काँग्रेसचा मेळावा संपन्न झाला, यामध्ये सर्वच नेत्यांनी महाआघाडीचा धर्म पाळून पै. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात कार्यकर्त्यांनी सक्रिय व व्हावे असे आदेश दिले होते. त्यानुसार पै.चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात नेते सक्रिय झाले तरी कार्यकर्त्यांनी मात्र पाठ फिरवली असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या हट्टापायी लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून महाआघाडीत तिढा निर्माण झाला होता. सांगली ऐवजी मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ सोडण्याची तयारी काँग्रेसने दाखवली होती. परंतु सांगलीमध्ये लढण्याचा हट्ट या नेत्यांनी सोडला नाही.
परंतु आता आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र दिसत असून "हातात मशाल डोक्यात विशाल" हा फंडा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अवलंबला आहे. निवडणूक प्रचारात केवळ काँग्रेसचेच कार्यकर्ते नव्हे, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही पाठ फिरवली आहे. परिणामी पै. चंद्रहार पाटील हे सांगली लोकसभा निवडणुकीत एकाकी पडले आहेत.