yuva MAharashtra शीतपेयांमधील कॅफेनमुळे किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेचा धोका

शीतपेयांमधील कॅफेनमुळे किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेचा धोका



सांगली समाचार - दि ४ एप्रिल २०२४
सांगली  - जिल्ह्यात तापमानाचा पारा चढू लागल्याने शीतपेयांना मागणी वाढली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्रास शीतपेयांचा वापर केला जात आहे. मात्र, सध्या बाजारात उपलब्ध काही शीतपेयांमध्ये कॅफेनचे प्रमाण जास्त असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. शीतपेयाच्या आडून मुलांना नशेची लत लागत आहे. कॅफेनच्या दुष्परिणामामुळे किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेचा धोका वाढला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे खानपानाच्या बदलणाऱ्या सवयींचे उदात्तीकरण व त्यातून होणाऱ्या या नशेमुळे पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून जिल्ह्यात तापमानाचा पारा चढला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शीतपेयांना मागणी वाढली आहे. शहरांसह ग्रामीण भागातही शीतपेय व एनर्जी ड्रींक्स सहज उपलब्ध होत आहेत. अगदी पानटपरीवरही तसेच छोट्या दुकांनांमध्ये जीवानावश्यक वस्तूंऐवजी शीतपेयांची उपलब्धता अधिक आहे. बदलत्या जीवनशैलीत आरोग्यदायी सरबताची जागा शीतपेयांनी घेतली आहे. गावातही उन्हाळ्यात शीतपेय पिले जातात. या शीतपेयांमध्ये कॅफेनचे प्रमाण असल्याने सौम्य नशा होत आहे. तसेच ती वारंवार पिण्याची इच्छा होत असल्याने नकळत याचे व्यसनच जडत आहे. लहान मुले, महिला व पुरुषही या शीतपेयांच्या आहारी जात आहेत.


सध्या सकाळ सत्रात शालेय परीक्षा सुरू असून बहुतांश चिमुरडी दिवसभर घरीच असल्याने व उकाड्याची तीव्रता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अशा शीतपेयांची खरेदी करून ती पीत आहेत. शीतपेयच तर आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, एनर्जी ड्रिंक्ससह बहुतांश शीतपेयांमध्ये कॅफेन असल्याचे दाहक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे शीतपेयांच्या आडून मुलांना नशेची लत लागण्याचा धोका संभवतो. एकीकडे व्यसनमुक्तीसाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती केली जात असताना शीतपेयाच्या गोंडस नावाखाली मुलांना व्यसनाच्या खाईत लोटले जात असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

पॅकिंगवरील सूचना कायद्याच्या हुलकावणीसाठी

१०० मिली शीतपेयामध्ये २९ मिली कॅफेनचे प्रमाण असते. बाजारपेठेत उपलब्ध शीतपेय ही १००, २००, ३०० ते ५०० मिलीपर्यंत उपलब्ध असल्याने कॅफेन वेगवेगळ्या प्रमाणात शरीरात जाणार आहे. एनर्जी ड्रिंक्सच्या बाटलीवरही साधारणपणे ७५ मिली ग्रॅमपेक्षा जास्त कॅफेन घेऊ नये, अशा सूचना असतात. मात्र त्या केवळ कायदा व करवाईला हुलकावणी देण्यासाठीच. कोणत्याही परिस्थितीत कॅफेन हे धोकादायकच आहे. १०० मिलीपेक्षा जास्त कॅफेन शरीरात गेल्यास मेंदू, किडणी, मज्जारज्जू निकामी होण्याची शक्यता असते. गरोदर किंवा स्तनदा मातांनी कॅफेन घेतल्यास बाळाला शारीरिक अपंगत्व किंवा मानसिक विकलांगता येत असल्याचे मत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.